शहरातील राम मंदिरजवळ पंचमुखी मारुती रस्ता परिसर गोळीबाराने हादरला. मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार टोल्या पोतदार याने गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारामुळे एकजण जखमी झाला आहे. घटनेनंतर टोल्या आणि त्याचा साथीदार पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने धाव घेतली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
टोल्या उर्फ प्रफुल्ल पोतदार, जमादार (पूर्ण नाव नाही) अशी संशयितांची नावे आहेत. यामध्ये निखिल जाधव जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा टोल्या त्याच्या साथीदारासमवेत राम मंदिरजवळील पंचमुखी मारुती रस्ता परिसरात थांबला होता. त्यावेळी निखिल घरी निघाला होता. टोल्याने स्वतःजवळील गावठी पिस्तूलातून निखिलच्या दिशेने तीन ते चार गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी निखिलच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला. तो खाली पडल्यावर टोल्या आणि त्याचा साथीदार तेथून पसार झाले.
राम मंदिर परिसरात गोळीबार झाल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टोल्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. जखमी निखिलला उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराचे कारण अस्पष्ट
दरम्यान टोल्याने निखिलवर कोणत्या कारणावरून गोळीबार केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र निखिलच्या मामाच्या आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहराच्या भर वस्तीत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली असून सातत्याने होणारे, खून, खुनीहल्ले यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.