'जन विश्वास' विधेयकावर संसदेचे शिक्कामोर्तब; किरकोळ गुन्हे रद्द, पण मोठ्या उल्लंघनासाठी १ कोटीचा दंड!
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आणलेले 'जन विश्वास विधेयक २०२६' गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेने बुधवारीच या विधेयकाला मंजुरी दिली होती. व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी आणि किरकोळ चुकांसाठी असलेली फौजदारी कारवाई टाळण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलेले होते. या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह लघु व मध्यम उद्योगांवरील जाचक अटींचा बोजा कमी होईल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
८० कायद्यांमध्ये होणार सुधारणा
२७ मार्च २०२६ रोजी लोकसभेत मांडण्यात आलेल्या या विधेयकाद्वारे ८० केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. यामध्ये कोळसा, वाणिज्य, जहाजबांधणी, नागरी विकास आणि वाहतूक अशा २३ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ७९ कायद्यांमधील एकूण ७८४ तरतुदींचा समावेश आहे. यातील ७१७ तरतुदींमधून तुरुंगवास रद्द करण्यात आलेला आहे. तर Ease of Living अंतर्गत ६७ बदल करण्यात आले आहेत.
आता तुरुंगवास नाही
या विधेयकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनेक गुन्ह्यांसाठी असलेली तुरुंगवासाची शिक्षा रद्द करून त्याऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार, पहिल्याच चुकीसाठी थेट दंड न लावता 'श्रेणीबद्ध' पद्धत अवलंबली जाईल. पहिल्या चुकीसाठी सल्ला दिला जाईल, दुसऱ्या चुकीसाठी ताकीद दिली जाईल आणि त्यानंतरच दंड आकारला जाईल. या नव्या कायद्याची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी 'न्यायनिर्णय अधिकारी' नियुक्त केले जातील. ते अधिकारी चौकशी करून दंड ठरवतील. तसेच या निर्णयांविरुद्ध दाद मागण्यासाठी अपिल प्राधिकरणाची स्थापना केली जाईल.दरम्यान, महामार्ग असुरक्षित किंवा वाहतुकीस अयोग्य ठरवल्यास आधी पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होता. आता त्यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत नागरी दंड आकारला जाईल. तर या विधेयकाद्वारे काही गुन्हे पूर्णपणे वगळण्यात आले आहेत. यामध्ये दिल्ली पोलीस कायद्यांतर्गत आगीचा खोटा अलार्म देणे, दिल्ली महानगरपालिका कायद्यांतर्गत जन्म-मृत्यूची नोंद करण्यासंदर्भातील गुन्हे, कॉपीराईट रजिस्टरमध्ये चुकीची नोंद करणे.. यासह किमान दंडामध्ये दर तीन वर्षांनी १० टक्क्यांनी वाढ करण्याची तरतूदही यात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.