Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पैशांच्या हव्यासापोटी अयानने ओलांडल्या मर्यादा; आईच्या स्त्रीधनावरही डल्ला!

पैशांच्या हव्यासापोटी अयानने ओलांडल्या मर्यादा; आईच्या स्त्रीधनावरही डल्ला!


अमरावती : परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. यासोबतच पोलिसांनी दुसऱ्याही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाचा आवाका वाढवला आहे, अशी माहिती अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

धक्कादायक म्हणजे, अय्याशीसाठी अयानने आपल्या आईचे सोन्याचे दागिने विकल्याचंही समोर आलं आहे. अयानला महागडे स्मार्टफोन वापरणे, आलिशान हॉटेलमध्ये पार्टी करणे आणि मुलींवर पैसे उधळण्याचा शौक होता. काही दिवसांपूर्वी त्याचा इन्स्टाग्राम व्हिडीओ समोर आला, ज्यात त्याच्याकडे भरपूर कॅश असल्याचं दिसत होतं. ही रोकड आईचे दागिने गुपचूप विकून अयानने मिळवल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलेलं आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

उजेर खानवर नवीन गुन्हा
विशाल आनंद म्हणाले, या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी उजेर खान इकबाल खान (वय २०) रा. परतवाडा याने गावातीलच एका १६ वर्षीय मुलीशी मोबाइलवरून संपर्क वाढविला होता. पालकांनी समज देऊनही त्याने हे प्रकार सुरूच ठेवले होते. अखेर मुलीच्या आईने परतवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या तक्रारीच्या आधारे उजेर खानवर नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरुणी आरोपींसोबत गेल्याची चर्चा चुकीची

वझ्झर धरण परिसरात एका तरुणीच्या आरोपींसोबत जाण्याबाबत पसरलेली चर्चा पूर्णपणे चुकीची असून, ती मुलगी सुरक्षित आहे. तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील एका १५ वर्षीय पीडितेचा जबाब विशेष तपास पथकातील महिला अधिकारी आणि बालकल्याण अधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे. हा जबाब आता मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी इतर पीडितांनाही निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जबाब नोंदवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पीडितेची ओळख कायदेशीररित्या पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

१८ व्हिडीओ, ३९ फोटो जप्त
आरोपींच्या मोबाइलमधून आठ पीडितांचे १८ व्हिडीओ आणि ३९ फोटो जप्त करण्यात आले आहेत. तपासाचा प्रत्येक पैलू बारकाईने तपासला जात असून, कुणाच्याही कल्पनेपलीकडच्या पद्धतीने पुरावे गोळा केले जात आहेत, असेही अधीक्षक आनंद यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीच जप्त केलेले पाच मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी सहा मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅब आणि एक हार्डडिस्क एसआयटीने जप्त केली आहे. हे सर्व साहित्य तातडीने विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे विशाल आनंद यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.