Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोखंड आणि सूर्यप्रकाशातून हायड्रोजनची निर्मिती! जपानचे 'हे' तंत्रज्ञान ठरणार गेमचेंजर; पेट्रोल-डिझेलला सुट्टी?

लोखंड आणि सूर्यप्रकाशातून हायड्रोजनची निर्मिती! जपानचे 'हे' तंत्रज्ञान ठरणार गेमचेंजर; पेट्रोल-डिझेलला सुट्टी?


जगभरात स्वच्छ ऊर्जेच्या शोधाला वेग आला आहे. हायड्रोजनला भविष्यातील सर्वात स्वच्छ इंधन मानले जाते. मात्र आतापर्यंत हायड्रोजन तयार करण्याची प्रक्रिया खूप महाग आणि गुंतागुंतीची होती. पण जपानमधील क्यूशू विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी अशी एक पद्धत शोधून काढली आहे. ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे. त्यांनी केवळ लोखंडाचे आयन आणि अल्ट्राव्हायोलेट  प्रकाशाच्या मदतीने हायड्रोजन तयार करण्यात यश मिळवले आहे.
रिपोर्टनुसार क्यूशू युनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरिंग फॅकल्टीतील असोसिएट प्राध्यापक ताकाहिरो मात्सुमोतो आणि त्यांच्या टीमने स्वस्त घटकांपासून उत्प्रेरक (कॅटलिस्ट) तयार करण्यासाठी संशोधन सुरू केले होते. याच दरम्यान एका कंट्रोल प्रयोगात त्यांनी मेथेनॉल, आयर्न आयन आणि सोडियम हायड्रॉक्साइड यांचे मिश्रण तयार केले. या मिश्रणावर अल्ट्राव्हायोलेट प्रकाश टाकल्यावर आश्चर्यकारक परिणाम दिसून आला.या मिश्रणातून मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू बाहेर पडू लागला. मात्सुमोतो म्हणाले, सुरुवातीला यावर विश्वास ठेवणे कठीण होते. त्यांनी याला एक सुखद योगायोग म्हटले ज्यामुळे विज्ञानासाठी एक नवीन मार्ग खुला झाला.
ही नवी तंत्रज्ञान इतकी खास का आहे?

सध्या बहुतेक हायड्रोजन जीवाश्म इंधनांपासून तयार केली जाते. ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. हायड्रोजन मेथेनॉलसारख्या अल्कोहोलपासूनही तयार करता येते. पण त्यासाठी महागडे आणि दुर्मिळ धातूंचे कॅटलिस्ट लागतात. लोखंड हा पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध आणि स्वस्त धातू आहे. या संशोधनात लोखंडाचा वापर करून महागड्या कॅटलिस्टइतक्याच वेगाने हायड्रोजन तयार करण्यात यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या प्रक्रियेत हायड्रोजन उत्पादन दर 921 मिलिमोल प्रति तास प्रति ग्रॅम  कॅटलिस्ट इतका नोंदवला गेला, जो आतापर्यंतच्या सर्वोत्तम प्रणालींच्या बरोबरीचा आहे.

केवळ मेथेनॉलपुरतीच मर्यादा नाही
या संशोधनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बहुपयोगिता . ही पद्धत फक्त मेथेनॉलपुरती मर्यादित नसून एथेनॉल आणि प्रोपेनॉलसारख्या इतर अल्कोहोलमधूनही हायड्रोजन तयार करता येते. याशिवाय, बायोमासमधील घटक जसे की ग्लुकोज, स्टार्च आणि सेल्युलोज यांच्यापासूनही हायड्रोजन निर्माण करण्यात यश मिळाले आहे. जरी सध्या ग्लुकोजसारख्या घटकांमध्ये कार्यक्षमता थोडी कमी असली तरी भविष्यात ती सुधारण्याची मोठी संधी आहे. ही तंत्रज्ञान कचऱ्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची ठरू शकते.
या प्रक्रियेत आव्हाने कोणती?

प्रत्येक मोठ्या शोधासोबत काही प्रश्नही उभे राहतात. मात्सुमोतो यांच्या टीमनुसार या रासायनिक प्रक्रियेचा अचूक यंत्रणा (mechanism) अजून पूर्णपणे समजलेली नाही. म्हणजेच ही प्रक्रिया आतून नेमकी कशी कार्य करते याचे सखोल विश्लेषण अजून बाकी आहे.

तसेच इतर पदार्थांमध्ये या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता वाढवणे हेही एक मोठे आव्हान आहे. तरीही ही पद्धत इतकी सोपी आहे की ती कोणीही पुन्हा करून पाहू शकतो. प्रोफेसर मात्सुमोतो यांनी तर मुलांनीही हा प्रयोग करून विज्ञानाकडे आकर्षित व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

स्वच्छ ऊर्जेसाठी किती मोठा बदल?
हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केल्यास कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन होत नाही. तर फक्त पाण्याची वाफ तयार होते. जर ही नवी आणि स्वस्त पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली तर हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या आणि वीज प्रकल्प खूप स्वस्त होऊ शकतात.

लोखंडासारख्या स्वस्त धातूचा आणि प्रकाशाचा वापर ही टिकाऊ विकासाच्या दिशेने मोठी झेप मानली जात आहे. भविष्यात अधिक संशोधन आणि सुधारणा करून ही तंत्रज्ञान आणखी प्रभावी बनवली जाऊ शकते. हा शोध जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमानवाढीशी लढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.