केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम सुरु केली आहे. यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक बोलावलेल्या बैठकीला जाताना अपघात होऊन लोहगाव येथील एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर रोटे (वय 40, रा. रोटेवाडी, रावळगाव अहिल्यानगर) असे मयत प्राध्यापकांचे नाव आहे. मतदार शोधण्याच्या कामाच्या दडपणात हा अपघात झाल्याचा शिक्षकांनी आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 एप्रिल) दुपारी साडेबारा वाजण्याच्या प्राध्यापक रोटे हे आपल्या दुचाकीवरून उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीला चालले होते. धानोरी लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटी समोर आले असता त्यांचा अपघात झाला. त्यांची दुचाकी घसरली आणि ते चेहऱ्यावर पडून त्यांना जखम झाली. यात त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्राध्यापक रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे होते. इंदापूर तालुक्यातील कळंब येथून त्यांची नुकतीच लोहगाव येथे बदली झाली होती. ते वडगाव शेरी मतदारसंघात बीएलओ म्हणून मतदार याद्या दुरुस्तीचे काम करत होते. त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा, अकरा वर्षांची एक मुलगी आहे. लोहगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून'ला पाठवला आहे. प्राध्यापक रोटे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला…
प्राध्यापक रोटे यांच्यासोबत रविवारी दिवसभर मतदार शोधून ते मॅपिंग करण्याचे काम त्यांच्या शाळेतील शिक्षकांनी केले. परंतु आज अपघाताची बातमी कानावर पडल्यानंतर शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक , विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. अत्यंत हुशार आणि मनमिळावू सहकारी गमावला असे सांगताना अनेक शिक्षकांना अश्रू अनावर झाले. शाळेतील काम सांभाळताना मतदार नोंदणीचे आणि अधिकाऱ्यांचे दडपण असल्याचे यावेळी शिक्षकांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये 107 मृत्यू :
यापूर्वी पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही SIR प्रक्रियेदरम्यान अनेकांचे मृत्यू झाले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, SIR प्रक्रियेदरम्यान मानसिक तणावामुळे 107 जणांचा मृत्यू झाले होते. नियम 169 अन्वये विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.