Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​ZP चा कारभार चव्हाट्यावर! प्रशासक काळातील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी हालचाली

​ZP चा कारभार चव्हाट्यावर! प्रशासक काळातील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी हालचाली


सांगली : जिल्हा परिषदेमध्ये चार वर्षे प्रशासकराजच्या काळात अनेक विभागात गैरप्रकार झाला आहे. त्यामुळे चार वर्षांतील कामाची विभागनिहाय चौकशी करा, दोषींवर नियमानुसार कारवाई करा, अशी मागणी सदस्यांनी केली. पहिल्याच सभेत आरोग्य, जलजीवन, शिक्षण, बांधकाम अशा अनेक विभागाच्या कामकाजावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
अध्यक्षा संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यामुळे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सीईओ विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, सभापती सावित्री रवी-पाटील, सभापती स्नेहल मोरे, सभापती पृथ्वीराज पाटील, सभापती दादासाहेब कोळेकर, पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते. पहिली सभा असल्याने औपचारिकता आणि स्वागतापुरती मर्यादित चर्चा होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. मात्र विषयपत्रिकेवरील चर्चा सुरू असतानाच सदस्यांनी ऐनवेळी विविध मुद्दे उपस्थित करत सभेचे स्वरूपच बदलून टाकले.

सरदार पाटील यांनी आरोग्य विभागातील स्वच्छता ठेका देताना गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. स्थानिक ठेकेदाराला डावलून बाहेरील ठेकेदाराला काम देण्यामागील कारण विचारले. तसेच डावललेल्या ठेकेदाराला त्याची निविदा नाकारण्याचे कारणही दिले जात नसल्याची तक्रार केली. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे सांगितले, मात्र सदस्यांचे समाधान झाले नाही. शेवटी याबाबत सविस्तर बैठक घेण्याचे निश्चित झाले.
जलजीवन योजनेतील रखडलेल्या कामांवरूनही संताप व्यक्त करण्यात आला. कोट्यवधींचा खर्च होऊनही अनेक ठिकाणी योजना अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. अपूर्ण कामांवर जास्तीची बिले दिल्याचा आरोप करण्यात आला. केंद्र सरकारकडून 51 कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने कामे रखडल्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. मात्र या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार बैठक घेण्याचे ठरले. चार वर्षांत लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक कामे रखडली असल्याचे सांगत खातेनिहाय निधी आणि खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी अर्जुन पाटील आणि शशिकांत जमदाडे यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या जुन्या वाहनांच्या निर्लेखनासह नवीन वाहन खरेदी करण्याचा विषय चर्चेला आला. मात्र या प्रस्तावालाही काही सदस्यांनी विरोध केला. पारंपरिक इंधनावरील वाहनांऐवजी बॅटरीवर चालणारी वाहने घेण्याची मागणी करण्यात आली. जितेश कदम, साईतेजस्वी देशमुख, विराज नाईक, माधवी पडळकर, सुनील पवार, रमेश देवर्षी, मोहन पाटील, अमित पाटील, अशा सदस्यांनी भागातील प्रश्न उपस्थित केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.