Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली Big Breaking! जतमध्ये काळाचा घाला: मरगुबाई देवीच्या यात्रेत भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; १५ जखमी

सांगली Big Breaking! जतमध्ये काळाचा घाला: मरगुबाई देवीच्या यात्रेत भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; १५ जखमी


जत तालुक्यातील मोठेवाडी येथे मंगळवारी भरलेल्या मरगुबाई देवीच्या यात्रेत एक भीषण दुर्घटना घडली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चिऱ्याच्या दगडाची भिंत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी असून अन्य १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​नेमकी घटना काय?
मोठेवाडी येथे मंगळवारी मरगुबाई देवीची यात्रा होती, त्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाली. पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक भाविकांनी जवळच असलेल्या एका शेडच्या भिंतीचा आडोसा घेतला. ही भिंत चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामाची होती. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने ही भिंत अचानक भाविकांच्या अंगावर कोसळली.
​मृतांमध्ये विजापूर आणि जतच्या भाविकांचा समावेश

या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ भाविक कर्नाटक राज्यातील विजापूर तालुक्यातील असून, उर्वरित ३ जण जत तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

​प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच जतचे प्रशासन आणि पोलीस दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जतचे प्रांताधिकारी अजय नष्ठे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यात्रेच्या आनंदावर विरजण पडल्याने आणि एकाच वेळी ६ जणांचा मृत्यू झाल्याने मोठेवाडीसह जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.