ठाणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शारमिंग डिंगा असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून त्या हकीम अजमल खान रुग्णालयात कार्यरत होत्या. शारमिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा परिसरातील ग्रेस स्कोअर या इमारतीत राहणाऱ्या शारमिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर शारमिंग डिंगा यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबत त्यांच्या कुटुंबीयांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, शारमिंग डिंगा या तीन मुलांची आई असून त्यांचे पती परदेशात नोकरीसाठी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे.
एक महत्त्वाचा संदेश:
जर तुमच्या ओळखीतील कोणी तणावात असेल किंवा कोणाच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्यांना मदतीची गरज आहे. कृपया खालील हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा:Vandrevala Foundation: 9999 666 555I Call: 022-25521111 (सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते रात्री १०)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.