पुणे : राज्यात अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून, शिक्षण विभागाच्या नोंदीत ४८७ शाळा बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, शाळांविरोधातील कारवाईची गती संथ आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांच्या माहितीसाठी अनधिकृत शाळांची यादी वर्षातून दोनदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिकांकडून जाणीवपूर्वक शाळांच्या प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर अनधिकृत शाळांच्या यादी जाहीर करण्यात येतात, असा आरोप होतो. याबाबत राज्य मंडळात आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांना विचारणा केल्यावर, त्यांनी माहिती दिली आहे.
राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात टाकणाऱ्या या शाळांपैकी केवळ ७६ शाळांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. या शाळांपैकी १११ शाळांविरोधात फौजदारी कारवाई सुरू आहे; तर ३२५ शाळांवर दंड आकारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष दंड वसुली केवळ १६ प्रकरणांतच झाली आहे. राज्यात सर्वाधिक अनधिकृत शाळा मुंबई विभागात आढळल्या आहेत.मुंबई विभागात तब्बल ३८९ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले असून, त्यापैकी फक्त ५९ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे १६ शाळांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली असून, ३१० शाळांवर दंड आकारण्यात आला आहे. मात्र, दंडाची वसुली केवळ पाच शाळांकडूनच झाली आहे. त्यामुळे कारवाईपेक्षा कागदी घोडेच अधिक नाचत असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
पुण्यात ११ शाळा बंद
पुणे विभागात ६३ अनधिकृत शाळा आढळल्या असून, त्यापैकी ११ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सात शाळांविरोधात फौजदारी कारवाई सुरू केली असून, दहा शाळांकडून दंड वसूल केला आहे. नागपूर विभागात ११ शाळांपैकी चार शाळांवर बंदीची कारवाई झाली असून, सहा शाळांविरोधात फौजदारी कारवाई सुरू आहेत. अमरावती विभागात चार शाळांपैकी एका शाळेवर कारवाई झाली आहे. नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये अनधिकृत शाळा आढळूनही बहुतांश ठिकाणी ठोस कारवाई झालेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनधिकृत शाळांचे जाळे नेमके किती खोलवर रुजले आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार:
एकूण अनधिकृत शाळा: ४८७मुंबई विभाग: ३८९ (सर्वात जास्त)पुणे विभाग: ६३कारवाई: ७६ शाळा आतापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत आणि १११ शाळांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
टीप: पुणे महानगरपालिकेने शहरातील १३ विशिष्ट शाळांची यादी देखील जाहीर केली आहे (उदा. कोंढवा, हडपसर, उंड्री भागातील शाळा). पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी शाळेचे 'शासन मान्यता प्रमाणपत्र' आवर्जून तपासावे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.