सांगली एलसीबीची मोठी कारवाई: बंद घर फोडणारे रेकॉर्डवरील ३ आरोपी जेरबंद; ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली :- वारणाली येथील विकास कॉलनीतील एक बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील तीन सराईत चोरट्यांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून ३,३०,२०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड हस्तगत करण्यात आली असून, त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुदर्शन सुनील यादव (वय २३, रा. वारणाली), सार्थक सुनील सुतार (वय २०, रा. संजयनगर, सांगली) आणि मुनीब उर्फ बाब्या मुस्ताक भाटकर (वय २१, रा. शामराव नगर, सांगली) अशी आहे. तर मेघनाथ हिरालाला साहू (रा. सांगली) हा आरोपी फरार आहे. हे तिन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील असून त्यांच्यावर यापूर्वीही मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत.
अशी मिळाली बातमी आणि पडला दरोडा:
काही दिवसांपूर्वी विकास कॉलनी, वारणाली येथे राहणाऱ्या स्नेहा गिरीधर कुंभार यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले होते. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश एलसीबीला दिले होते.
त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक शोध घेत होते. दि. १८ मे २०२६ रोजी पथकातील अंमलदार संदीप पाटील, प्रकाश पाटील आणि ऋषिकेश सदामते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी सार्थक सुतार, सुदर्शन यादव आणि मुनीब भाटकर हे चोरीचे दागिने विकण्यासाठी सह्याद्रीनगर ते शिंदे मळा रेल्वे ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक महादेव पोवार व त्यांच्या पथकाने या परिसरात पाळत ठेवली. तिथे संशयास्पदरित्या थांबलेल्या तीन तरुणांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (डोले, ब्रेसलेट, चैन, वेढण, झुबे) आणि रोख रक्कम सापडली.
एक महिन्यापूर्वी केली होती घरफोडी:
पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी महिनाभरापूर्वी विकास कॉलनीतील बंद घर फोडून ही चोरी केल्याची कबुली दिली. तसेच उर्वरित दागिने फरार आरोपी मेघनाथ साहू याच्याकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी ३,३०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपासासाठी आरोपींना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, प्रकाश पाटील, अतुल माने, अमोल ऐदाळे, श्रीधर चमके, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, विनायक सनदी, रोहन घस्ते, सुरज थोरात आणि सायबर पोलीस ठाण्याचे सतीश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.