आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा भारतीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. वाढत्या जागतिक संकटामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करा, तसेच सध्या सोने खरेदी टाळा, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मेट्रोचा वापर करण्यावर भर देण्यास सांगितले असून, शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य द्यावे आणि इलेक्ट्रिक वाहने वापरावीत, असे सुचवले आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने ३ मोठे निर्णय घेतले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने खर्चात बचत करण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकारी कामकाजासाठी आता फक्त इलेक्ट्रिक वाहनेच वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारपासून प्रशासकीय स्तरावरील सर्व बैठका 'ऑनलाइन' पद्धतीने घेतल्या जातील, जेणेकरून प्रवासाचा खर्च आणि इंधनाची बचत होईल. इतकेच नाही तर, यावर्षी फ्रान्स येथे होणाऱ्या प्रतिष्ठित 'कान्स चित्रपट महोत्सवा'साठी महाराष्ट्र सरकार आपले कोणतेही प्रतिनिधी पाठवणार नाही. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने हा 'काटकसरीचा' निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारचे ३ मोठे निर्णय -
१. महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ यंदा फ्रान्समधील 'कान्स चित्रपट महोत्सवा'साठी जाणार नाही.२. शासकीय कामकाजासाठी यापुढे केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EVs) वापर३. प्रशासकीय विभागांच्या सर्व बैठका ऑनलाइन (Virtual) घेतल्या जातील.देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यंदा फ्रान्स येथील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, "कठीण काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विभागीय खर्चात संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, इथून पुढे जास्तीत जास्त बैठका व्हर्च्युअल (आभासी) माध्यमातून घेतल्या जातील आणि संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाईल." कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणारे मराठी चित्रपट आणि त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय व सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील. मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल, तिथे आपण ऑनलाइन माध्यमातून सहभागी होऊ, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
मोदींनी काय केले होते आवाहन?
आखाती देशांतील वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 'काटकसरीचा' मंत्र दिला. इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी काही महत्त्वाचे उपाय सुचवले. कोविड-१९ महामारीच्या काळात अवलंबलेल्या पद्धतीप्रमाणेच, इंधन बचतीसाठी 'घरून काम' (Work From Home) आणि ऑनलाइन मिटिंग (Virtual Meetings) घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रोत्साहन द्या. किमान एक वर्षासाठी अनावश्यक परदेश प्रवास पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे. लग्नकार्य किंवा इतर समारंभांसाठी किमान एक वर्षासाठी नवीन सोन्याचे दागिने खरेदी करू नका, जेणेकरून देशाचे परकीय चलन वाचवता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.