Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाकी वर्दीतील शिवभक्त! ‘राजा शिवाजी’ पाहून विश्वास नांगरे पाटील भारावले, रितेशची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल

खाकी वर्दीतील शिवभक्त! ‘राजा शिवाजी’ पाहून विश्वास नांगरे पाटील भारावले, रितेशची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल


रितेश देशमुख  दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला.

या सिनेमाची केवळ महाराष्ट्रात नसून, देशभरात चर्चा सुरू आहे. या सिनेमात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात सलमान खानच्या भूमिकेविषयी प्रचंड चर्चा झाली. सलमान खानने या ऐतिहासिक सिनेमात जीवा महाले यांची भूमिका साकारली. जीवा महाले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक होते. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकवर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाचं कलाकारांपासून इतर क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुक केलं. दरम्यान, या चित्रपटाविषयी राज्याचे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची पोस्ट व्हायरल 

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी 'राजा शिवाजी' चित्रपटाविषयी एक भारावून टाकणारी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या ऐतिहासिक सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमाविषयी विश्वास नांगरे पाटील म्हणतात,

'राजा शिवाजी : एक अजरामर कलाकृती. महाराष्ट्र दिनी ज्वलंत, धगधगता शिव छत्रपतींचा बाल, युवा अवस्थेतील दैदिप्यमान कालखंड या चित्रपटात पाहायला मिळाला. हा समर पट पाहताना अंगातील अनु रेणू स्फुल्लिंगीत होतात , रग पेटते , रक्त सळसळते. संवाद रोमांच उभे करतात. वीर रसातील छत्रपतींची स्तुती ही सतत गुंजारव करते. इतिहासाचा सखोल अभ्यास करून यातले प्रसंग उभे केलेले दिसतात. पूर्ण वेळ तुम्ही तुमची पाठ खुर्चीला टेकवू शकत नाही.

सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र यवनांच्या अंमलाखाली पिसत होता. महिलावर अत्याचार , हत्या, जबरदस्ती धर्म परिवर्तन आम बात झाली होती. अहमदनगरच्या निजामशाहने खुलेआम जिजाऊ मातेचे पिता, काका आणि भावांची हत्या केली. फलटणचे शासक बालाजी निंबालकरांचे बीजापुरच्या सुल्तानाने धर्म परिवर्तन केले होते. धर्मपरिवर्तन, गौहत्या और अत्याचारांच्या घटनांनी माँ जिजाऊचे हृदय पिळवटून निघत होते. त्या विचार करायच्या, 'या अन्यायी राजवटीचा अंत का होऊ शकत नाही. माझ्या पुत्रामध्ये या राक्षसी वृत्तीला थोपवण्याचे सामर्थ्य येऊ शकेल काय!'... आणि मग झंझावात उभा राहीला. शिवजन्मापूर्वी आदिलशाहने पुण्याला गाढवाच्या नांगराने खणले होते आणि शिवरायांनी त्याच भूमीत सुवर्णनांगर लावून पावन केले. सुजलाम सुफलाम केलं. गनिमी काव्याने गनीमास नामोहरम केले.

शिवरायांची जडणघडण, त्यांचे माँ जिजाऊं, पिता शहाजी राजे आणि बंधू संभाजीशी असणारे भावनिक नाते, त्यांचे युद्ध कौशल्य, रयतेवरची त्यांची निष्ठा, सवंगडी मावळे, राजकारण, युद्ध नीती, कूटनीती आणि शेवटी खानाचा खात्मा! सगळं कसं अप्रतिम, भव्य दिव्य! अजय अतुलचे संगीत तर अजेय !! शिवाजी महाराज आणि शंभू राजे गेल्यानंतर महाराष्ट्र औरंगजेबासाठी सहज होता का ? नाही तर राजा शिवाय हा महाराष्ट्र बलाढ्य मोगली सत्तेसमोर एक दोन नाही २५ वर्षे ठाम उभा राहिला. बेदरकारपणे भिडला आणि लढला ! कारण शिवरायांनी स्थापन केलेले राज्य हे भोसल्यांचे नव्हते, एकही किल्ल्याचा सातबारा राजांच्या नावावर नव्हता. हे हिंदवी स्वराज्य होते , रयतेचे राज्य होते. हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा होती. या स्वराज्याची संकल्पना रितेश देशमुख यांनी दमदार स्वरूपात नव्या पिढीला समजावून सांगितली आहे. या टोलेजंग कलाकृतीला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम मिळेल, हे निश्चित ! जगदंब जगदंब !!'

रितेश देशमुखकडून विश्वास नांगरे पाटील यांचे आभार

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन कौतुक केलं. अभिनेता रितेश देशमुखनेही कमेंट करुन त्यांचे आभार मानले आहेत. विश्वास नांगरे पाटील यांच्या पोस्टवर रितेश देशमुखने, 'आपले खूप खूप आभार @vishwasnangrepatil जी..' अशी कमेंट केली आहे.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तमरित्या सुरुवात केली आहे. दरम्यान, विकेंडला हा सिनेमा किती कोटींची कमाई करेल, हे लवकरच समोर येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.