'पुरवठा साखळीत अडथळे..', राज्यातील पेट्रोल-डिझेल तुटवड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून इंधन खरेदी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला आवश्यक त्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमितपणे होत आहे. मात्र, अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदीसाठी रांगा लावत असल्याने पुरवठा साखळीवर ताण येतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढते.
…म्हणून जाणवतोय तुटवडा –
"पुरवठा व्यवस्था ही अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित असते. अचानक अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करू लागले, तर पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घबराट निर्माण करण्याचे कारण नाही," असे मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिम आशियातील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रावर परिणाम होत असल्याची पार्श्वभूमी असताना राज्य सरकारने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ –
दरम्यान, १५ मे रोजी इंधन दरात प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढ झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सरासरी ९० पैशांची आणखी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर ९१ पैशांनी वाढून प्रतिलिटर १०७.५९ रुपये झाला असून डिझेलचा दर ९४ पैशांनी वाढून ९४.०८ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे.केंद्र सरकारनेही देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी वाराणसी येथे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गेल्या चार वर्षांत दोन मोठ्या युद्धांमुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रासमोर आव्हाने निर्माण झाली, तरी भारतात कच्चे तेल, एलपीजी किंवा पाइपलाइन गॅसचा तुटवडा निर्माण होऊ दिला नाही. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर दबाव वाढला असला, तरी भारताने ऊर्जा सुरक्षेचे व्यवस्थापन प्रभावीपणे केल्याचा दावा त्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.