"बाप बदलणाऱ्यांच्या टोळीत मी नाही!" व्यंगचित्र शेअर करत सुषमा अंधारेंचा ट्रोलर्ससह पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर घणाघात
मुंबई : विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे, मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता.
तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, उपनेत्या सुषमा अंधारे आदींच्या नावाची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वत: विधान परिषदेवर न जाता अंबादास दानवे यांना संधी दिली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राखी बांधतानाचा व्हिडीओ पोस्ट करत 'आमदारकी आणि खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान' असे म्हटले होते. यावरून सुषमा अंधारे यांना ट्रोल करण्यात आले. मात्र आता सुषमा अंधारे यांनी ट्रोलर्सनाच ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.
सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे एक व्यंगचित्र फेसबुक पोस्ट करताना म्हटले की, ट्रोल करताना ट्रॉलिंगला सुद्धा एक दर्जा असला पाहिजे. दोन दिवसांच्या ट्रोलिंगमध्ये सगळ्यात दर्जेदार आणि मला आवडलेलं हे व्यंगचित्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामगार सेनेच्या कुण्या पाटलाने हे शेअर केलं. आता भाजपचा कामगार म्हटल्यावर त्याचे ब्रेड बटर याच्यावरच चालणार. त्यामुळे तो त्याच्या उपजीविकेसाठी करत आहे हे समजून घ्या आणि त्याला माफ करा. आता जरा पुढे जाऊया, या चित्रामध्ये मी सन्मानाने पक्षप्रमुखांकडे विधान परिषदेचा हट्ट धरते आहे. ही फारच सुंदर कल्पना आहे. घरातल्या व्यक्ती या आपल्या कुटुंबप्रमुखाकडेच हट्ट करतात. घरातला बाप सोडून शेजाऱ्याला ते बाप म्हणत नाहीत. आणि बापाने आपला हट्ट पुरवला नाही तर ते बापाला सोडून दारोदार नवा बाप शोधत नाहीत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीत प्रवेश केलेल्या नेत्यांवर निशाणा साधला.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा ट्रोलिंग कामगार भलेही वेठबिगार असेल. पण याने जे या चित्रात दाखवलं ते फार महत्त्वाचं. कारण जिथे कुणी प्रकाश आंबेडकरांचा फोटो आपल्या कार्यालयात लावून त्यांना आपला दैवत बाप म्हणून नंतर भूमिका बदलल्या. किंवा कोणी निवडणुकीत म्हणाला बिरोबाची शपथ माझ्या कुटुंबातला जरी कुणी उभं राहिलं, तरी भाजपला मतदान करू नका. ते नंतर भाजपसाठी वाटेल ते करायला लागले. सदाभाऊ खोतसारखा माणूस एकेकाळी राजू शेट्टींना आपला जिगरी मित्र, बाप-भाऊ म्हणत होता त्यांच्याही भूमिका आता बदलल्या आहेत. महादेव जानकर यांना एकेकाळी मान्यवर कांशीरामजी वैचारिक आदर्श वाटत होते. प्रज्ञा सातव आपल्या सात पिढ्यांचा दाखला देत आपण काँग्रेसचे किती प्रामाणिक आहोत हे सांगत होत्या. पण त्यांनीही भूमिका बदलली. बच्चु भाऊंचा विषय तर स्वतंत्र ग्रंथ लेखनाचा विषय आहे…! राणेंना आधी बाळासाहेब ठाकरे बाप वाटायचे. मग काही काळ त्यांचं कुलदैवत दिल्लीच्या सोनिया गांधी झाल्या. सध्या ते नागपूरच्या आसरा म्हसोबाला पुजतात. त्यातही त्यांच्या दोन मुलांनी दोन वेगवेगळे बाप माणूस निवडले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशोक चव्हाण यांचा बाप भाऊ चुलता सब कुछ काँग्रेस होतं. पण ईडीच्या दप्तराने त्यांचं गोत्र बदललं. चित्रा वाघ एकेकाळी शरद पवारांना बाप म्हणायच्या… भुजबळ, मुश्रीफ, तटकरे आणि वळसे पाटील हे माझ्यापेक्षा प्रचंड श्रेष्ठ आहेत, पण आपला राजकीय बाप थकलाय म्हटल्यावर त्यांना सुद्धा 'कालाय तस्मै नमः' करत फडणवीसांनी आखून दिलेल्या फॅमिली ट्री सोबत नातं जोडावच लागलं. ज्या सांगलीच्या चंद्रहार पाटलांसाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या संपूर्ण काँग्रेसची वैर घेतले, त्या चंद्रहार पाटील यांना अचानक त्याचा बाप बदलल्याची जाणीव झाली. राखी जाधव, देवरुखकर, बडगुजर असे अजून खूप सार्या चिल्लर खुरट्या झाडाझुडपांचा इथे उल्लेख करता येईल. पण त्यामुळे लेख उगाच पाल्हाळ लावल्यासारखा होईल. पण काहीही असो. हे व्यंगचित्र आवडलं मला. कारण या व्यंगचित्रात मी माझ्या कुटुंबप्रमुखा सोबत आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सलाच सुनावले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.