"शासनाच्या उदासीनतेमुळे रेशन दुकानदार संकटात"


अमरावती तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानचालक आर्थिक अडचणीत सापडले असून मागील सहा महिन्यांपासून कमिशन थकीत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जानेवारी ते मार्च, या कालावधीत धान्य वितरणाचे काम पूर्ण करूनही अद्याप कमिशन न मिळाल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शासनाने मोफत धान्य वाटपाचे मार्जिन १५० वरून १७० रुपये प्रति क्विंटल करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप न झाल्याने दुकानदारांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. रेशन दुकानदारांकडून अनेक प्रकारची अतिरिक्त ऑनलाइन व प्रशासकीय कामे करून घेतली जात आहेत. मात्र या कामांसाठी स्वतंत्र मानधन किंवा कर्मचारी साहाय्य उपलब्ध नाही. यामध्ये सर्व ऑनलाइन नोंदी व बदल, हमीपत्र भरून घेणे, कार्डधारकांच्या नोंदींची तपासणी व अद्ययावत करणे, मृत्यू नोंदीनुसार नावे कमी करणे, विवाहानंतर किंवा स्थलांतरानंतर नावे जोडणे व कमी करणे, कार्ड हस्तांतरण प्रक्रिया यासर्व कामांमुळे दुकानदारांवर मोठा प्रशासकीय ताण येत असून आर्थिक मोबदला मात्र मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास स्वस्त धान्य दुकानचालकांनी व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. योग्य उपाययोजना न झाल्यास धान्य वितरण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
ई-पॉस व बायोमेट्रिक प्रणालीतील अडचणी

२०१५ पासून रेशन दुकाने ई-पॉस व बायोमेट्रिक प्रणालीवर चालवली जात आहेत. लाभार्थ्याचा अंगठा पडल्याशिवाय धान्य वितरण व कमिशन नोंद होत नाही. मात्र या प्रणालीत वारंवार तांत्रिक त्रुटी व बदल होत असल्याने वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.