स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची धडक कारवाई; इचलकरंजीच्या तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त!
सांगली पोलिसांची अवैध शस्त्रांविरुद्ध मोहीम: ब्रिजखाली रचला सापळा
सांगली: सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा , सांगली च्या पथकाने एका १९ वर्षीय तरुणाला विनापरवाना अग्निशस्त्रासह रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून ६१ हजार रुपये किमतीचे ०१ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ०२ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
आरोपीची माहिती आणि गुन्ह्याची नोंद
अटक आरोपी: शिवम अर्जुन शिंगारे (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. ४, आण्णा रामगोंडा शाळेजवळ, नारुल चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर)
गुन्हा नोंद: सांगली ग्रामीण पोलीस ठाणे (गु.र.नं. १४९/२०२६)
कलम: आर्म ॲक्ट ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५(१) (३)/१३५ प्रमाणे.
फिर्यादी: श्रीधर महादेव बागडी (पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली)
सांगली जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व मा. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
पेट्रोलिंग दरम्यान जुना जकात नाका, इनाम धामणी येथे आले असता, सपोनि सुभाष सूर्यवंशी, पो.अंमलदार सचिन कनप आणि सोमनाथ पतंगे यांना खास बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली की, 'एक चॉकलेटी रंगाचा चौकड्याचा शर्ट घातलेला तरुण जुनी धामणी ते अंकली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर कमरेजवळ संशयास्पद वस्तू खोचून थांबला आहे.'
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ गाड्या थांबवल्या. तेथून कोल्हापूर ते रत्नागिरी हायवे ब्रिजखालून अंकली फाटकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर, अयांश इंटरप्रायझेस गोडावूनजवळ दबा धरून वॉच ठेवला. बातमीतील वर्णनाप्रमाणे एक तरुण तिथे उभा असलेला दिसताच, पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्याला जागीच घेरले आणि ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी शिवम शिंगारे याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला एक लोखंडी पिस्तुल (अग्निशस्त्र) आणि पॅन्टच्या डाव्या खिशात दोन जिवंत काडतुसे (राऊंड) मिळून आली.
या शस्त्रांबाबत विचारपूस केली असता, सदरचे पिस्तुल आणि काडतुसे ही त्याने २ वर्षांपूर्वी त्याचा ओळखीचा 'गजानन खामकर (रा. इचलकरंजी)' याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.
पोलीस कोठडी सुनावली:
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरु तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) इस्माईल तांबोळी करत आहेत. अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला दिनांक २५/०५/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर अशीच प्रभावी व कठोर कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.कारवाई करणारे पोलीस पथक:सदरची धडक कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली:पोलीस निरीक्षक: संजीव झाडेपोलीस उपनिरीक्षक: कुमार पाटीलपोलीस अंमलदार: सपोनि सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, सचिन कनप, सोमनाथ पतंगे, रुपेश होळकर, सुमित सूर्यवंशी, विजय पाटणकर आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.