सांगली: बनावट शिक्के की सरकारी संगनमत? प्रवीण अण्णाच्या 'त्या' ऑफिसची झाडाझडती घ्या; परवानाधारकांचा संताप
सांगली: राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचार आणि अनधिकृत हस्तक्षेपाचे एक गंभीर प्रकरण समोर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, 'प्रवीण अण्णा' नावाच्या व्यक्तीच्या खाजगी कार्यालयाची तात्काळ तपासणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या कार्यालयात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकृत रजिस्टर आणि रबरी शिक्के उपलब्ध असल्याची खळबळजनक चर्चा असून, हे शिक्के विभागातले आहेत की बनावट, याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
२०१६ पासूनच्या प्रस्तावांत मोठी फेरफार?
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ पासून प्रवीण अण्णाने सादर केलेल्या सर्व प्रस्तावांची कसून चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. जागेच्या मंजूर नकाशांमध्ये फेरफार करून आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करून संबंधित जागा मालकांकडून ८ ते १० लाख रुपयांची उकळती केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या बदल्यात संबंधित अधिकाऱ्यांना केवळ नाममात्र 'दक्षिणा' देऊन गप्प केले जात असल्याची चर्चा परवानाधारकांमध्ये आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि डेटा काढल्यास अधिकारी अडकणार?
तक्रारदारांच्या मते, जर या खाजगी कार्यालयावर तात्काळ छापा टाकून तेथील संगणक प्रणाली सील केली आणि त्याचा डेटा तपासला, तर अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस येऊ शकतात. तसेच, कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास तिथे कोणत्या अधिकाऱ्यांचा राबता असतो आणि तिथे कोणते छुपे व्यवहार चालतात, याचे सत्य जनतेसमोर येईल.
सांगली दर्पणची मागणी अधीक्षकांनी कारवाई करावी!
या सर्व प्रकारामुळे सामान्य जनता आणि प्रामाणिक परवानाधारकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित खाजगी कार्यालयाची पाहणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता आक्रमकपणे केली जात आहे. जर वेळेत कारवाई झाली नाही, तर यातील पुरावे नष्ट केले जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
क्रमश....
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.