Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"तमिळनाडूत राजकीय भूकंप! विजय यांच्या पक्षाचा बहुमताचा आकडा पार; ४ मित्रपक्षांच्या बळावर 'थलपती' सरकार येणार"

​"तमिळनाडूत राजकीय भूकंप! विजय यांच्या पक्षाचा बहुमताचा आकडा पार; ४ मित्रपक्षांच्या बळावर 'थलपती' सरकार येणार"


चेन्नई: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे ४ दिवसांपासून सत्ता पेच कायम होता. पण आता हा पेच संपला आहे. काँग्रेससह लहान पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात थलपती विजय यांचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. 
दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षानं सर्वाधिक १०८ जागा जिंकल्या. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना विजय यांनी धूळ चारली. पण बहुमतापासून टीव्हीके पक्ष दूर राहिला. राज्यात सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. टीव्हीकेच्या १०८ जागा निवडून आल्या आहेत. विजय दोन मतदारसंघांमधून विजयी झाले आहेत. त्यामुळे टीव्हीकेकडे १०७ आमदार आहेत.
बहुमतासाठी ११८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची दोनदा भेट घेतली. तेव्हा विजय यांच्याकडे ११३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र होतं. काँग्रेसच्या ५ आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला असल्यानं टीव्हीकेचा आकडा ११३ वर पोहोचला. यानंतर आता तीन लहान पक्षांनी टीव्हीकेला समर्थन दिलं आहे. यात डाव्या पक्षांचा समावेश आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके यांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला आहे. या तिन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकत्रित ६ आमदारांचं बळ आहे. या पाठिंब्याच्या जोरावर टीव्हीकेनं बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे शिट्टीचं चिन्ह घेऊन पहिल्याच निवडणुकीत शंभरहून अधिक जागा आणणाऱ्या विजय यांच्या पक्षाचं सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात गेल्या चार दिवसांपासून सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरु होत्या. विजय यांनी राज्यपालांची दोनदा भेटली. त्यांना ११३ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्रदेखील दिलं. पण राज्यपालांनी त्यांना ११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन येण्यास सांगितलं. आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आमदारांचा आकडा दाखवा. त्यांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र द्या. मगच शपथविधी होईल, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली होती.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.