नवी दिल्ली : इंधनाच्या किमतीचा भडका आणि सोने व चांदीवरील आयात शुल्कात झालेली वाढ यामुळे जूनपर्यंत किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांवर जाईल. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईवर होणारा परिणाम स्थिरावण्याची प्रतीक्षा रिझर्व्ह बँक करेल. त्यानंतर चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत व्याजदर वाढविण्यात येतील, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
देशभरात १५ मेपासून अकरा दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७.३८ रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटिर ७.४८ रुपये वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये हे दर थोड्याफार प्रमाणात कमी जास्त आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा वापर होणाऱ्या क्षेत्रांमध्ये या दरवाढीचा थेट परिणाम जाणविणार आहे. विशेषत: वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होणार असून, वीजनिर्मितीवर काही अंशी परिणाम होईल. याचबरोबर सरकारने १३ मे रोजी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून १५ टक्के केले असून, याचाही परिणाम महागाईवर होईल. मे महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी १२ जूनला जाहीर होणार आहे.या पार्श्वभूमीवर ईवाय इंडियाचे मुख्य धोरण सल्लागार डी.के.श्रीवास्तव म्हणाले की, पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत प्रतिलिटर सरासरी ७.५ रुपये वाढ झाल्यास किरकोळ महागाईत पाऊण टक्का वाढ होईल. किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४ ते ४.५ टक्के राहील. जूनमध्ये हा दर ४.५ ते ५ टक्क्यांवर जाईल. किरकोळ महागाईतील वाढ ही किमती वाढल्याने होणार असल्याने व्याजदरात वाढ करण्याचा महागाई नियंत्रणावर मर्यादित परिणाम होईल. इंधन दरवाढीमुळे होणारा परिणाम तिमाहीत स्थिरावण्याची प्रतीक्षा रिझर्व्ह बँक करेल आणि त्यानंतर व्याजदर वाढीबाबत निर्णय घेतला जाईल. किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या पुढे गेल्यास रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढ सुरू होईल.
याबाबत बार्कलेज इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आस्था गुडवानी म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेकडून जूनमधील पतधोरणात व्याजदरात बदल केले जाणार नाहीत. सध्याची अस्थिर परिस्थिती आणि इंधन दरवाढीचा वाहतूक भाडे व कच्च्या मालाच्या किमतीवर होणारा यामुळे चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत महागाईत वाढ होईल. महागाई आटोक्याबाहेर गेल्यास व्याजदर वाढ करणे अपरिहार्य ठरेल. रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षातील किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ वरून ५ टक्क्यांवर नेला जाईल. याचबरोबर विकास दराचा अंदाज ६.९ वरून ६.७ टक्क्यांपर्यंत खाली आणला जाण्याची शक्यता आहे.
जूनमधील पतधोरण स्थिर?
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक ५ जूनला होत आहे. या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवले जातील, असा अंदाजही अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे. मागील पतधोरण बैठक ८ एप्रिलला झाली होती. घाऊक महागाईचा दर एप्रिलमध्ये ८.३ टक्के या ४२ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला. जागतिक पातळीवर वस्तूंच्या किमतीत वाढ होऊनही ती वाढ ग्राहकांपर्यंत न पोहोचविल्याने एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दरात फारशी वाढ न होता तो ३.४८ टक्के नोंदविण्यात आला. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ठरविताना प्रामुख्याने किरकोळ महागाई दराचा विचार केला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.