सांगली दर्पण Exclusive! वरिष्ठ अधिकारी प्रवीण आण्णाच्याच दरबारात मारतात सह्या? परमिट रूम, बिअर शॉपी आणि वाईन शॉप चालकांमध्ये तीव्र संताप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी!
सांगली :- राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) सांगली विभागाच्या कार्यक्षेत्रात सध्या एका खाजगी इसमाच्या वाढत्या हस्तक्षेपाने आणि 'दुकानदारीने' सीमा ओलांडली असून, 'प्रवीण आण्णा' नावाच्या एका कथित दलालाने थेट शासकीय यंत्रणेलाच ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील परमिट रूम, बिअर शॉपी आणि वाईन शॉपचे अधिकृत 'डेली स्टॉक रजिस्टर' शासकीय कार्यालयात असण्याऐवजी या प्रवीण आण्णाच्या आलिशान खाजगी ऑफिसमध्ये असतात आणि तिथेच खरा 'काळाबाजार' चालतो, अशी तीव्र भावना त्रस्त व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या 'प्रवीण आण्णा' नावाच्या किडीने संपूर्ण सांगली एक्साईज विभागाला पोखरले असून त्याचा तातडीने नायनाट करावा, अशी आक्रमक मागणी आता परमिट रूम आणि बिअर शॉपी चालकांमधून जाहीरपणे होऊ लागली आहे.
खाजगी आलिशान ऑफिस की एक्साईजचा उप-विभाग?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण आण्णा याने सांगलीत एक अद्ययावत आणि आलिशान खाजगी ऑफिस थाटले आहे. हे ऑफिस म्हणजे शासकीय नियमांची ऐशीतैशी करण्याचे मुख्य केंद्र बनले आहे. नियमानुसार परमिट रूम किंवा वाईन शॉपचे डेली स्टॉक रजिस्टर हे संबंधित दुकानात किंवा सरकारी देखरेखीखाली असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रवीण आण्णाच्या या आलिशान अड्ड्यावर जिल्ह्यातील अनेक दुकानांचे रजिस्टर्स आणून ठेवले जातात. तिथेच बसून स्टॉकची फेरफार करणे (स्टॉक ॲडजस्टमेंट), हिशेब जुळवणे आणि कागदोपत्री गैरप्रकार लपवण्याचे 'गौडबंगाल' राजरोसपणे सुरू असते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 'दरबार' वाऱ्या!
या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे, ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गैरप्रकारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, तेच अधिकारी या प्रवीण आण्णाच्या खाजगी ऑफिसला नियमित भेटी देतात. याच आलिशान ऑफिसमध्ये बसून शासकीय कागदपत्रांवर, रजिस्टर्सवर वरिष्ठांच्या सह्या आणि तपासणीचे सोपस्कार पार पाडले जातात. याच 'टेबलाखालून' मोठे आर्थिक व्यवहार आणि लाचखोरीचे आकडे निश्चित केले जातात, असा थेट आरोप व्यावसायिकांनी केला आहे.
"प्रवीण आण्णा हा सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागलेली मोठी कीड आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्याचा हा कारभार सुरू आहे. प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो आणि आण्णाच्या दरबारात हजेरी लावणाऱ्यांचे काळे धंदे पाठीशी घातले जातात. या दलालाचा बंदोबस्त झालाच पाहिजे!"
— त्रस्त परमिट रूम व बिअर शॉपी चालक (सांगली जिल्हा)
मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करणार; आंदोलनाचा इशारा
सांगली एक्साईज विभागातील या 'समांतर' कारभारामुळे शासनाचा महसूल बुडत असण्याची दाट शक्यता असून, प्रामाणिक व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. प्रवीण आण्णाच्या या नव्या कारनाम्यामुळे विभागाची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि 'प्रवीण आण्णा'वर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सांगलीतील परमिट रूम आणि वाईन शॉप चालकांनी दिला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, की 'प्रवीण आण्णा'च्या या आलिशान साम्राज्याला असेच पाठीशी घालतात, याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.