Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! महाभ्रष्टाचार! सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाचखोर श्रीनिवास जोशी रंगेहात गळाला; सांगली सिव्हिलचे '७७ नंबर' कनेक्शन काय?

सांगली दर्पण Exclusive! महाभ्रष्टाचार! सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लाचखोर श्रीनिवास जोशी रंगेहात गळाला; सांगली सिव्हिलचे '७७ नंबर' कनेक्शन काय?


जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आशिर्वादाने 'प्रतिनियुक्ती'चा गोरखधंदा? 'ना खाऊंगा, ना खाणे दूंगा'च्या राज्यात भ्रष्टाचारच बनलाय शिष्टाचार!

सांगली/सातारा : सरकारी रुग्णालये ही गरिबांच्या हक्काची उपचाराची जागा राहिलेली नसून, ती लाचखोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची चराऊ कुरणे बनली आहेत, याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. नातेवाईकाच्या आजारपणामुळे आधीच खचलेल्या एका तक्रारदाराकडून वैद्यकीय बिल प्रतिपूर्तीचे वर्गीकरण करून देण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना काशीळ (जि. सातारा) येथून प्रतिनियुक्तीवर आलेला लाचखोर श्रीनिवास जोशी याला रंगेहात पकडण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, ही कारवाई सातारा एसीबीने  न करता सांगली जिल्ह्याच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे सातारा आणि सांगली वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळजनक उडाली असून, प्रशासकीय यंत्रणेचे धिंडवडे कळाले आहेत.

​कारवाई सांगलीच्या पथकाची; मग साताऱ्याचे एसीबी पथक झोपले होते का?

​या धडक कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात आणि जनतेत काही अत्यंत गंभीर आणि मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत:

​प्रश्न १: सातारा पथकाची मूक संमती होती का?
सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या पथकाला यावे लागते, याचा अर्थ काय? सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) या लाचखोरांना मूक संमती होती की त्यांचे साटेलोटे होते, अशी रास्त शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत.
​प्रश्न २: सांगलीच्या पथकाला स्वतःच्या जिल्ह्यातील 'महाभाग' का दिसत नाहीत?
भ्रष्टाचाराची पाळेमुळे एवढी घट्ट आहेत की, ज्या कर्मचाऱ्याविषयी आधीपासूनच अनेक गंभीर तक्रारी होत्या, तो मूळचा सांगली जिल्ह्याशी संबंधित असताना सांगलीच्या पथकाला तो आधी का सापडला नाही? साताऱ्यात येऊन जाळे टाकण्याची वेळ का आली?
​प्रश्न ३: लाचखोरांना 'प्रतिनियुक्ती'चे संरक्षण कोणाचे?
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे हे दोन गंभीर प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांची बदली करून चौकशी सुरू आहे. तरीही प्रशासनाला शिस्त लागलेली नाही. जिल्हा शल्य चिकित्सकांना अशा भ्रष्ट 'कलेक्टर' प्रवृत्तीच्या माणसांना स्वतःच्या सोयीसाठी प्रतिनियुक्तीवर घेण्याचे अधिकार कोणी दिले? हा बदल्यांचा आणि प्रतिनियुक्तीचा अंतर्गत मलिदा गँगचा भाग आहे का?
​प्रश्न ४: घोषणा हवेत, भ्रष्टाचार हाच शिष्टाचार?
"ना खाऊंगा, ना खाणे दूंगा" अशा मोठमोठ्या घोषणा देणाऱ्या राज्यकर्त्यांच्या राज्यात सामान्य जनता मात्र लुटली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात अशीच लाचखोरीची घटना उघडकीस आली असताना, साताऱ्यात हा प्रकार घडतो, याचा अर्थ लाचखोरांना कायद्याचा किंवा सरकारचा कोणताही धाक उरलेला नाही.
​सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे '७७ नंबर'चे गुपित काय? कधी होणार मोठ्या माशांवर कारवाई?

​साताऱ्यातील या कारवाईचे धागेदोरे थेट सांगलीपर्यंत पोहोचले आहेत. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील '७७ नंबर' मध्ये सध्या असाच काहीसा संशयास्पद आणि भ्रष्टाचाराचा गोरखधंदा सुरू असल्याची उघड चर्चा आहे. सामान्य रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करून खिसे कापण्याचे काम येथे सुरू असल्याचा आरोप होत आहे.

​श्रीनिवास जोशीसारखे छोटे मासे तर केवळ 'एजंट' म्हणून समोर येतात, पण या लाचेच्या पैशांमधील मोठा हिस्सा वरच्या पदांवर बसलेल्या 'मोठ्या माशांच्या' घशात जातो. या मोठ्या माशांवर प्रशासन कधी गळ टाकणार? सांगली सिव्हिलच्या '७७ नंबर'ची सखोल चौकशी करून येथील भ्रष्टाचाराचा अड्डा उद्ध्वस्त केला जाणार का, याकडे आता सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
क्रमश.....

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.