Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

146 कोटी कॅश अन् सोनं... महिला खासदाराच्या घरात सापडलं घबाड; खासदाराबरोबरच मुलालाही अटक

146 कोटी कॅश अन् सोनं... महिला खासदाराच्या घरात सापडलं घबाड; खासदाराबरोबरच मुलालाही अटक 


राजकीय नेते किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार ही भारतीयांसाठी काही नवीन गोष्ट राहिली नाही. अवघे 10 ते 12 हजार कमवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याकडे कोट्यवधींची बेनामी संपत्ती सापडल्याचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.

मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकारामध्ये महिला खासदराच्या घरामध्ये तब्बल 146 कोटी रुपयांची कॅश आणि सोनं सापडलं आहे. मात्र ही महिला खासदार भारतीय नसून इराकमधील आहे. सध्या या महिला खासदाराच्या घरातील नोटांच्या ढीगाचे फोटो व्हायरल झाल्याचं दिसत आहे.

कोण आहे ही महिला खासदार?

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये महिला खासदार आलिया नासीफ यांना अटक करण्यात आली आहे. आलिया यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही इराकमधील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलं आहे. नासीफ यांचा मुलगा पूर्वी माजी पंतप्रधान मोहम्मद शिहा अल सुदैनी यांच्या राजवटीदरम्यान पंतप्रधान कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करायचा. सध्या इराकमध्ये राजकीय नेत्यांविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहिम सरकारकडून हाती घेण्यात आली आहे. वरिष्ठ असो अथवा कनिष्ठ भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्वच राजकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा सपाटाच येथील सुरक्षा यंत्रणांनी सुरु केला असून त्याअंतर्गतच महिला खासदाराच्या घरात हे घबाड सापडलं आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध भडाभडा बोलल्या
नासीफ यांचा एक जुना व्हिडीओही व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये त्या, "आम्हालाही अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याचं दिसतं. मात्र आमचे हात बांधलेले आहेत," असं म्हणताना दिसत आहेत. "तुम्हाला आठवत असेल यापूर्वी मी समितीसमोर ज्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारले होते तो बगदादमधील रिफायनरीचा प्रमुख होता. त्याच्याकडे बगदादमधील सर्व रिफायनरीची जबाबदारी होती. म्हणजे हे पहिलं प्रकरण होतं जे मी हाताळलं होतं. त्यामुळे मला रिफायनरींमध्ये काय होतं याची कल्पना आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी समिती तयार केली तेव्हा एक वकील म्हणून मला कल्पना होती ही हे सारं काही कायदेशीर मार्गाने आणि कायद्यावर आधारित व्हायला हवं. मात्र भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि आपल्या देशाचे पैसे पुन्हा सरकारी तिजोरीमध्ये टाकण्यासाठी काहीही मदत लागली तर मी कधीही तयार आहे," असंही या व्हायरल व्हिडीओमध्ये नासीफ यांनी म्हटल्याचं दिसत आहे. सध्या नासीफ यांच्यावर टीकेची झोड उठली असून लोकांना शिकवणारी महिला खासदाराच्या घरातच 146 कोटी रुपये कॅश सापडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.