कोल्हापूर :- रोज दारू पिऊन आईला मारहाण; वैतागलेल्या मुलाने ज्या कोयत्याने चिकन तोडायचा, त्याच कोयत्याने बापालाच तोडलं!
वडील दररोज दारू पिऊन आईला आणि मला बेदम मारहाण करत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलानेच मित्राच्या मदतीने वडिलांची निर्घृण हत्या केली. वडील ज्या सत्तुराने चिकन तोडायचे त्याच सत्तुराने त्यांच्या डोक्यात वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलानेच वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती.
दोन दिवसांपूर्वी विहिरीत सापडलेल्या फिरोज खानसो मुजावर (वय ४३, रा. महाजन कॉलनी, नागाव, ता. हातकणंगले) यांच्या खुनाचे रहस्य आज उलगडले. फिरोजचा मुलगा रेहान फिरोज मुजावर (वय २०) आणि त्याचा मित्र वीरपाशा सैंदुलाल जहाँगीरदार (रा. हनुमाननगर, शिये) या दोघांना पोलिसांनी अटक केली. तपासात दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.
फिरोज मुजावर हे बेपत्ता असल्याची तक्रार मुलगा रेहानने दिली होती. दरम्यानच्या काळा बेवारस मृतदेह एका विहिरीत पोलिसांना आढळला. तपास पथकाने फिरोज मुजावर हे बेपत्ता झालेल्या ठिकाणापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. तपासात बेपत्ता व्यक्ती आण मृतदेह हा एकच असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाच्या तोंडात कापडी बोळा, डोक्यात आणि पाठीवर गंभीर जखमा त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने केला.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी नातेवाईक आणि साक्षीदारांकडे चौकशी केली. यात फिरोज दिवस-रात्र दारू पिऊन त्याची पत्नी आणि मुलांना प्रचंड त्रास देत असल्याचे समोर आले. याच त्रासाला कंटाळून रेहान याने वडिलांचा काटा काढण्याचे ठरवले. शुक्रवारी (ता. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास, रेहानने त्याचा मित्र वीरपाशा जहाँगीरदार याच्या मदतीने वडील फिरोज यांना राहत्या घराच्या पाठीमागे नेले. तिथे रेहानने त्याच्या चिकनच्या दुकानातील धारदार सत्तूराने फिरोज यांच्या डोक्यात जोरदार वार करून त्यांना जागेवरच ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनी मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन एका विहिरीमध्ये फेकून दिला.पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सागर वाघ, शिरोली पोलिस ठाण्याचे सुनील गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, अमित पांडे, पोलिस अंमलदार संदीप पाटील, रामचंद्र कोळी, महेश आंबी, महेश खोत, वसंत पिंगळे, महेश पाटील, सचिन जाधव, अमित सर्जे, अरविंद पाटील, नजीर शेख, सुहास संकपाळ, नीलेश कांबळे, महादेव बिरंजे, योगेश कोळी, अभिजित गायकवाड या पथकाने कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.