Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुटखा तस्करांवर कारवाई करा, किरकोळ व्यावसायिकांना वेठीस धरू नका; सांगलीत पानपट्टीधारकांचा मोर्चा

गुटखा तस्करांवर कारवाई करा, किरकोळ व्यावसायिकांना वेठीस धरू नका; सांगलीत पानपट्टीधारकांचा मोर्चा


सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरातील पानपट्टीधारकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा पान असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सांगली जिल्ह्यातील सुमारे सहा हजार पानपट्टीचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चानंतर झालेल्या सभेत महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी पानपट्टीचालकांना वेठीस धरणे थांबवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने सन २०१२ मध्ये गुटखा बंदी लागू केल्यानंतर पानपट्टीधारकांनी या निर्णयाचे स्वागत करून पूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर पानपट्टीधारकांना विश्वासात न घेता विविध निर्बंध लादण्यात आले. परिणामी हजारो छोट्या व्यावसायिकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांपासून सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा आणि कासेगाव परिसरातील पानपट्टीधारकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे.
महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी होत असताना तस्करांवर कठोर कारवाई करण्याऐवजी किरकोळ पानपट्टीधारकांना लक्ष्य केले जात असल्याची तीव्र नाराजी संघटनेने व्यक्त केली. जिल्ह्यातील सुमारे सहा हजार पानपट्टीधारक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पानपट्टीधारकांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देण्याऐवजी गुटखा तस्करांवर आणि अवैध साठेबाजांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, जिल्हा कार्याध्यक्ष युसूफ जमादार, मनपा क्षेत्राध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, अशोक कारंडे, मकरंद जमदाडे, जिल्हा खजिनदार राजू पागे, प्रकाश मोरे, इमरान मर्चंट, मयूर बांगर, राजेंद्र कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पानपट्टीचालक उपस्थित होते.
राज्यभर आंदोलनाचा इशारा

पानपट्टीधारकांवर अन्यायकारक कारवाई, कठोर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार किंवा दडपशाही सुरूच राहिल्यास महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी दिला. पानपट्टीधारकांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने संतुलित भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.