Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमरावती इर्विन रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर मोठा हातोडा! जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस, ८ डॉक्टरांचे घरभाडे भत्ते तडकाफडकी रोखले!

अमरावती इर्विन रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर मोठा हातोडा! जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस, ८ डॉक्टरांचे घरभाडे भत्ते तडकाफडकी रोखले!


जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) व शहरातील इतर जिल्हा रुग्णालयांमधील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची गंभीर दखल घेत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक (एसीएस) डॉ. निरवणे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, कर्तव्यावर गैरहजर आढळलेल्या आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे घरभाडे भत्ते रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
राज्यस्तरीय नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी १५ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची अचानक पाहणी केली होती. या पाहणीत स्वच्छता, रुग्णसेवा, प्रशासनाचे नियोजन आणि देखरेख यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच रुग्णालय प्रशासनातील नियंत्रणाचा अभाव स्पष्ट झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.नोटीस प्राप्त अधिकाऱ्यांनी समाधानकारक खुलासा न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, डफरीन रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, इर्विनमधील प्रलंबित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागालाही निर्देश देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.