- जिल्ह्यात 10 परीक्षा केंद्रे, 4572 परीक्षार्थी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना
- केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
सांगली:- जिल्ह्यात नीट-युजी फेरपरीक्षा 2026 सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, परीक्षेसाठी नियुक्त संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, अफवा किंवा अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणारी नीट-युजी फेरपरीक्षा 2026 जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर दि. 21 जून 2026 रोजी पार पडणार आहे. 4572 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमिवर पूर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीपासून ते परीक्षा संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत असून, केंद्रांवर प्रवेश करण्यापूर्वी उमेदवारांची सखोल तपासणी केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
बैठकीत परीक्षा केंद्रांवरील मूलभूत सुविधा, परीक्षार्थींसाठी आवश्यक सोयी, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची सुरक्षित हाताळणी, उमेदवारांच्या प्रवेश प्रक्रियेतील दक्षता, वाहतूक व्यवस्थापन, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठीच्या उपाययोजना तसेच परीक्षा सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून, उमेदवारांची ओळख पडताळणी व सुरक्षा तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी परीक्षा केंद्रांभोवती सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आल्याची माहिती देत, वाहतूक नियंत्रण व संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. परीक्षार्थींनी प्रवेशपत्रासह वैध ओळखपत्र सोबत आणावे. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या निर्धारित वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.