मुंबई : राज्यातील भाजप आमदार आणि खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष संघटना, सोशल मीडिया आणि जनसंपर्काच्या मुद्द्यावरून काही लोकप्रतिनिधींची कानउघाडणी केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर पक्षाची भूमिका, सरकारची कामगिरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना आणि कामांचा प्रसार न करणाऱ्या १२ आमदारांवर मुख्यमंत्री संतापल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सोशल मीडियाचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना लोकप्रतिनिधींना (आमदार आणि खासदारांना) स्पष्ट शब्दांत सुनावले. सरकारकडून मतदारसंघासाठी निधी, विकासकामे आणि विविध प्रकल्पांची अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याच विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक आमदार प्रयत्न करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री १२ आमदारांवर का संतापले?
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही आमदारांच्या समाज माध्यमांवरील अकाऊंट्सचा आढावा घेतला. यामध्ये तब्बल १२ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील सोशल मीडियावर फॉलो केले नसल्याचे निदर्शनास आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. त्यांनी संबंधित आमदारांना चांगलेच फटकारले.
...तर त्याचा राजकीय फटका बसू शकतो, फडणवीसांकडून आमदारांना खडसावले
सर्वांना निधी पाहिजे, प्रकल्प पाहिजेत, विकासकामे पाहिजेत पण मग सरकारने केलेले काम सोशल मीडियावर दिसत का नाही? तुम्ही केलेले काम जनतेपर्यंत पोहोचले नाही तर त्याचा राजकीय फटका बसू शकतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना इशारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
निधी-प्रकल्प पाहिजे तर योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावीच लागेल
समाजमाध्यमे केवळ प्रचार-प्रसाराचे माध्यम नसून जनतेशी थेट संवाद साधण्याचे साधन असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. सरकारच्या योजनांची माहिती, मतदारसंघातील विकासकामे आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार करणे अनिवार्य असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी खडसावलेले ते १२ आमदार कोण, राजकीय वर्तुळात चर्चा या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार खासदारांना खडसावल्याच्या बातमीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, ते आमदार खासदार कोण? याची खुबीने विचारपूस होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.