कोलकाता : प. बंगालमधील विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. पक्षाच्या आर्थिक तिजोरीवरील नियंत्रणावरून सुरू असलेल्या वादात, तब्बल ४४० कोटी रुपये जमा असलेली टीएमसीची ३ बँक खाती पोलिसांनी 'डेबिट फ्रीझ' केली आहेत. पक्षाच्याच बंडखोर आमदारांनी या निधीच्या स्रोताची चौकशी करण्याची मागणी करत तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्षांतर्गत लढाई अधिक तीव्र झाली आहे.
आर्थिक अधिकार हवेत
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री अरूप बिस्वास आणि विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटात पक्षाच्या संघटनात्मक आणि आर्थिक अधिकारांवरून तीव्र सत्तासंघर्ष सुरू आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीमुळेच ही कारवाई झाली.
बंडखोर आमदारांचे गंभीर आरोप
ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटातील १० आमदारांनी बिधाननगर पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर क्राइम पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करून एफआयआर नोंदवण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या आमदारांनी खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांच्या स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचा तपास यंत्रणांनी शोध घ्यावा, असे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.