Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत 'स्पा'च्या नावाखाली देहविक्रीचा विळखा! पोलिसांच्या नाकाखाली अनैतिकतेचा बाजार; 'मलई' खाणारे खाबूराव कधी सुधारणार?

सांगलीत 'स्पा'च्या नावाखाली देहविक्रीचा विळखा! पोलिसांच्या नाकाखाली अनैतिकतेचा बाजार; 'मलई' खाणारे खाबूराव कधी सुधारणार?


पोलिस अधीक्षकांच्या 'विशेष पथका'ची गरज; सामाजिक संस्था आक्रमक, आता तरी कारवाईचा धडाका उडणार का?

सांगली :- नॅचरल थेअरपीच्या नावाखाली थायलंड, बँकॉक येथून सुरू झालेला अनैतिकतेचा कॅन्सर आता सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पाय पसरू लागला आहे. सांगली, मिरज आणि विश्रामबाग परिसरात 'स्पा' आणि 'मॉलिश सेंटर'च्या गोंडस नावाखाली उघडउघड देहविक्री आणि अनैतिक कृत्ये सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​कॅफे हाऊस की 'मिनी लॉज'? ...पोलिसांना माहिती नाही, हे कसे शक्य आहे?

​काही दिवसांपूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅफेबाहेर निरोधचा साठा सापडला. तर थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अगदी समोर असणाऱ्या एका कॅफेमध्ये चक्क बेड आणि बंदिस्त केबिन आढळून आल्या. सांगलीतील एका कॅफेमध्ये निरोधची पाकिटे आणि गर्भनिरोधक गोळ्या सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

​विशेष म्हणजे, हा सगळा काळाबाजार 'श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान'ने पुढाकार घेऊन छापे टाकण्यासाठी आग्रह धरल्यानंतर समोर आला. मग प्रश्न पडतो की, पोलीस खात्यातील तथाकथित 'खबऱ्यांचे' जाळे इतके दिवस काय झोपले होते? की त्यांना जाग येऊ दिली जात नव्हती?

​खात्यातच चर्चा: स्पा मालकांकडून पोलिसांना मोठी 'मलई'!
पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे सगळे उघडपणे सुरू असताना स्थानिक पोलीस गप्प का? कारण स्पा सेंटरच्या मालकांकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा मोठी 'मलई' (हप्ता) दिली जाते, अशी जाहीर चर्चा आता पोलीस खात्यातच रंगू लागली आहे.
​वसुलीबहाद्दर जोमात, त्यांची उचलबांगडी कधी होणार?

​वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून, खात्यात राहूनच अवैध धंद्यांना पाठीशी घालणारे 'कारभारी' सध्या जोमात आहेत. पोलीस अधीक्षकांच्या नाकाखाली हे वसुलीबहाद्दर आपले खिसे भरत असून, गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. अशा भ्रष्ट आणि वसुलीबहाद्दर कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांनी कधी करणार? हाच खरा प्रश्न आहे.

​परजिल्ह्यांतील उच्चभ्रू ग्राहक आणि ५ ते १० हजारांची 'खास सेवा'
​सांगली आणि मिरजेतील या स्पा सेंटर्सचे जाळे इतके विस्तारले आहे की, येथे शेजारच्या जिल्ह्यांतून उच्चभ्रू ग्राहक येत आहेत. कोणत्याही अनोळखी ग्राहकाला सुरुवातीला केवळ साधी स्पा सेवा दिली जाते. मात्र, ग्राहक ओळखीचा आणि नियमित असेल, तर त्याला बंद खोलीत 'खास सेवा' पुरवली जाते. या अनैतिक सुखासाठी ग्राहक एका रात्रीचे ५ ते १० हजार रुपये मोजायला तयार असतात.
​प्रामाणिक व्यावसायिकांना नाहक बदनाम करू नका!

​दरम्यान, सांगलीतील सर्वच स्पा सेंटर्स चुकीची नाहीत. काही ठिकाणी आयुर्वेदिक शास्त्रानुसार आणि योग्य पद्धतीने मॉलिश केले जाते. तिथे महिला आणि पुरुष दोघांसाठीही नियमानुसार पर्याय उपलब्ध असतात. मात्र, काही मोजक्या नराधमांमुळे आणि पैशांच्या हव्यासापोटी चालणाऱ्या अनैतिक केंद्रांमुळे या प्रामाणिक व्यावसायिकांना नाहक बदनामीचा सामना करावा लागत आहे.

​आता तरी 'विशेष पथक' नेमणार का?
​ज्या-ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे गैरप्रकार सुरू आहेत, तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता, पोलीस अधीक्षकांनी स्वतःचे 'विशेष पथक'  नेमावे आणि या अनैतिक स्पा सेंटर्सवर कारवाईचा धडाका लावावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने कारवाई करावी, अन्यथा हा अनैतिकतेचा बाजार मोडून काढण्यासाठी सामाजिक संस्थांना कायदा हातात घेऊन थेट छापेमारी करावी लागेल, असा इशारा आता दिला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.