पुणे 'पीडब्ल्यूडी'चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही
पुणे: सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंतापदी गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने विभागाचा बोजवारा उडाला आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईतील अधिकाऱ्याकडे असल्याने, महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी पुणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दर दोन दिवसांनी शासकीय वाहनाने मुंबई गाठावी लागत आहे.
त्यामुळे वेळेचा, इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे.
पुणे प्रदेशचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे सेवानिवृत्त झाल्यानंतर, १ एप्रिल रोजी प्रज्ञा वाळके यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. मात्र, त्यांच्याकडे आधीच इतर दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी असल्याने त्यांना पुण्यात येऊन कामकाज पाहणे शक्य होत नाही. त्या महिन्यातून एखाद्या वेळेसच पुणे कार्यालयात येतात.परिणामी, दैनंदिन मंजुरी आणि महत्त्वाचे टपाल घेऊन पुणे कार्यालयातील वाहन आणि कर्मचारी सातत्याने मुंबईला चकरा मारत आहेत. या प्रकारामुळे पुण्यातील अधिकारी, कर्मचारी प्रचंड वैतागले आहेत. शासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पुणे 'पीडब्ल्यूडी'साठी लवकरात लवकर पूर्णवेळ मुख्य अभियंत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाच जिल्ह्यांतील विकासकामे रखडली
पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. मुख्य अभियंते कार्यालयात उपलब्ध नसल्याचा थेट फटका या पाचही जिल्ह्यांतील दैनंदिन कामकाजाला आणि विकासकामांना बसत आहे. वेळेवर मंजुरी न मिळाल्याने अनेक फाइल्स प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींनाही कामांसाठी थेट मुंबईला धाव घ्यावी लागत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.