सांगली :-"गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात कोणतीही शिथिलता किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. खून, दरोड्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये पोलिस अधिकारी किंवा अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास, त्यांचे थेट निलंबन करण्यात येईल," असा कडक आणि थेट इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आयजी शर्मा गुरुवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. संजयनगर पोलिस ठाण्याला भेट दिल्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी, त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला आणि कडक सूचना दिल्या. या बैठकीला सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक संदीप भागवत, प्रणिल गिल्डा आणि निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.
ॲक्शन प्लॅन आणि 'दिसणारे पोलिसिंग'
"लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल असे 'व्हिजिबल पोलिसिंग' (दिसणारे पोलिसिंग) आता सांगलीत पाहायला मिळेल." सांगलीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह एक ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे शर्मा यांनी सांगितले. आता पोलिस केवळ पोलिस ठाण्यात न बसता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कडक कारवाई करताना दिसतील. येत्या काही महिन्यांतच सांगलीकरांना हा सकारात्मक बदल प्रकर्षाने जाणवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बंडगर हत्याकांडातील आरोपींवर 'मोक्का'चा बडगा
संजयनगरमधील बहुचर्चित बंडगर खून प्रकरणाचा उल्लेख करताना आयजी शर्मा भावूक झाले. "हे प्रकरण अत्यंत वेदनादायी आहे," असे सांगत त्यांनी या गुन्ह्याचा सखोल आढावा घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपी निष्पन्न झाले असून, या संपूर्ण टोळीवर लवकरच 'मोक्का' अंतर्गत कडक कारवाई केली जाईल. या गुन्ह्यातील एकाही दोषीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.