Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

DP बदलला अन् डायरेक्ट ७.८ कोटी गायब! भारताच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला गंडा; ऑनलाईन विश्वात मोठी खळबळ!

DP बदलला अन् डायरेक्ट ७.८ कोटी गायब! भारताच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाला गंडा; ऑनलाईन विश्वात मोठी खळबळ!


देशाचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे सुपुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल यांच्या कंपनीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ७.८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सायबर चोरट्यांनी नरेश गुजराल यांचा फोटो वापरून आणि त्यांच्या कर्मचाऱ्याचा फोन हॅक करून अत्यंत हुशारीने हा कोट्यवधींचा घोटाळा केला. मात्र, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तत्परता दाखवत यातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक रक्कम विविध बँक खात्यांमध्ये गोठवून ठेवली.

हॅकिंग आणि फसवणुकीचा भयंकर कट
हा सर्व प्रकार १२ जून ते १६ जून या चार दिवसांच्या कालावधीत घडला. नरेश गुजराल हे एका कपड्यांच्या व्यवसायाचे मालक आहेत. ते सध्या शहराबाहेर असताना सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेतला. सायबर चोरट्यांनी नरेश गुजराल यांच्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर एक मालवेअर फाईल पाठवली. ती फाईल उघडताच त्या कर्मचाऱ्याचा फोन हॅक झाला.
नंबर बदलला, डीपी तोच ठेवला

फोनचा ताबा घेतल्यानंतर भामट्यांनी कर्मचाऱ्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील नरेश गुजराल यांचा खरा नंबर बदलून तिथे स्वतःचा नंबर टाकला, पण नाव आणि व्हॉट्सॲपचा प्रोफाईल फोटो मात्र गुजराल यांचाच ठेवला. त्यामुळे नवीन नंबरवरून येणारे मेसेजही कर्मचाऱ्याला नरेश गुजराल यांच्याकडूनच येत असल्याचा भास झाला. या बनावट अकाऊंटवरून गुन्हेगारांनी तातडीच्या व्यावसायिक कामासाठी पैशांची गरज आहे, असे भासवून कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्याचे आदेश दिले.

अशी उघड झाली फसवणूक
आपल्या मालकाचाच मेसेज आहे असे समजून कर्मचाऱ्याने चार दिवसांत चार वेळा एकूण ७.८ कोटी रुपये ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम एकाच वेळी ट्रान्सफर होत असल्याने बँकेने संशय व्यक्त केला आणि कंपनीचे मुख्य अधिकाऱ्याकडे मंजुरी मागितली. मात्र, त्या अधिकाऱ्याने देखील हे आदेश नरेश गुजराल यांनीच दिले असावेत असा अंदाज बांधून या व्यवहारांना मंजुरी दिली.

१६ जून रोजी कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला या व्यवहारांबाबत काहीतरी संशयास्पद वाटले. त्यांनी खात्री करण्यासाठी थेट नरेश गुजराल यांच्या मुलीशी संपर्क साधला. मुलीने जेव्हा बाहेरगावी असलेल्या वडिलांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तात्काळ दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्यात आली.
पैशांचा माग आणि पोलिसांची कारवाई

तक्रार मिळताच दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स निटचे पोलीस उपायुक्त विनीत कुमार आणि टीमने तातडीने तपास चक्रे फिरवली. तपासात समोर आले की, आरोपींनी सर्वात आधी ही रक्कम महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील ४ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवली होती. त्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी हे पैसे ३० ते ४० वेगवेगळ्या म्युल अकाऊंट्समध्ये ट्रान्सफर केले.

४.२८ कोटी रुपये गोठवले
पीडित कुटुंबाने वेळेत तक्रार केल्यामुळे पोलिसांनी बँकांशी संपर्क साधून वेगवेगळ्या खात्यांमधील सुमारे ४.२८ कोटी रुपयांचा निधी गोठवला आहे. "माझी कंपनी आणि सीएफओ या फसवणुकीचे बळी ठरले. मी शहराबाहेर होतो. पण, आम्ही सायबर गुन्हे शाखेकडे लगेच तक्रार केल्यामुळे त्यांनी आम्हाला ७० टक्क्यांहून अधिक रक्कम परत मिळवून देण्यास मदत केली आहे आणि उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल अशी आशा आहे. मी दिल्ली पोलिसांच्या सायबर टीमचे कौतुक करतो," असं नरेश गुजराल म्हणाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.