नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन यांच्या द्रमुकचा पराभव झाला. नवख्या विजय जोसेफ यांच्या पक्षाने द्रमुकला हादरा देऊन सत्तेतून दूर खेचले. विजयच्या पक्षापुढे द्रमुक, अण्णा द्रमुक आणि भाजपचा टिकाव लागला नाही. तत्पूर्वी तामिळनाडूत हात पाय रोवण्यासाठी भाजपने अण्णा द्रमुकशी जुळवून घेतले होते. मात्र या युतीवर तत्कालिन प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई नाराज झाले. आता त्याच अण्णामलाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले आहे. आज त्यांनी राजधानी नवी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत पक्ष सोडत असल्याचे सांगितले. विजय जोसेफ यांनी दोन वर्षांपूर्वी नव्या पक्षाची स्थापन केली, तशाच प्रादेशिक पक्षाची स्थापन करण्याचे अण्णा मलाई यांनी ठरवले आहे.
अण्णामलाई नेमके कोण आहेत?
अण्णामलाई यांनी तामिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले. केवळ ३६ व्या वर्षी त्यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. अल्पावधीत त्यांनी तामिळनाडूत भाजप पक्ष रुजवला, अनेक नवे सहकारी जोडले. त्यामुळे तामिळनाडूत त्यांना खूप कमी काळात लोकप्रियता मिळवता आली. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अण्णा मलाई भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) सेवा बजावत होते.
कर्नाटकात आयपीएस म्हणून एक दशक गाजवले
राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी कर्नाटकात आयपीएस म्हणून एक दशक गाजवले. अण्णा मलाई कर्नाटक केडरचे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा धाडसी स्वभाव आणि कठोर कार्यशैलीमुळे त्यांना कर्नाटकचे सिंघम म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोएंबतूर येथून इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन त्यांनी लखनौच्या आयएमएममधून एमबीएचे शिक्षण घेतले. प्रशासनात जाऊन देशाची सेवा करण्याचे त्यांनी लहानपणापासूनच ठरवले होते. त्यानुसार पदवीनंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते आयपीएस झाले. कर्नाटकात सेवा बजावताना उडपीचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी एका कॉलेजात असलेले ड्रग्ज माफियांचे जाळे मोडून काढले. त्यानंतर त्यांना उडपीचे सिंघम ही नवी ओळख मिळाली. आपल्या नऊ वर्षांच्या सेवेत केलेल्या बेधडक कारवाईने त्यांचे पोलीस दलात आदराने नाव घेतले जाऊ लागले.
...अन् अण्णामलाईंचा भाजप प्रवेश
अण्णामलाई यांनी २०१९ साली निवृत्ती घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी पक्ष संघटनेत जोरदार काम केले. त्यांच्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांच्यावर थेट प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी झपाटून काम केले. तामिळनाडूच्या गावागावात जाऊन त्यांनी पक्षाचा विचार पोहोचवला. पक्षाची ध्येयधोरणे समजावली.
भाजपविरोधात बोलले, पक्षाने पदावरून दूर सारले
सगळे काही सुरळीत सुरू असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तामिळनाडूत अण्णा द्रमुकशी जुळवून घेण्याचे ठरवले. अण्णा मलाई या युतीसाठी राजी नसताना त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यावेळी ही युती सपशेल अपयशी ठरणार असल्याचा इशारा त्यांनी पक्षनेतृत्वाला दिला. तसेच अण्णामलाई यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या इयत्ता नववीसाठीच्या त्रिभाषा सुत्रावरून नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या धोरणावर नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या स्वभावानुसार त्यांना पदावरून बाजूला सारले गेले. त्यामुळे अण्णामलाई नाराज झाले. पक्षासाठी काम करूनही आपल्याला बाजूला केल्याची खंत त्यांच्या मनात होती.
लवकरच अण्णामलाई करणार नव्या पक्षाची घोषणा
यादरम्यानच विजय जोसेफ यांनी नवा पक्ष काढून त्यांना तामिळी जनतेने भरभरून आशीर्वाद दिल्याने अण्णामलाई यांच्या मनात वेगळा पक्ष काढण्याचा विचार निश्चित झाला. ठरल्याप्रमाणे अण्णामलाई यांनी पक्षनेतृत्वाला सांगून भाजप सोडत असल्याचे जाहीर केले. पुढच्या काही दिवसांत ते नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोईम्बतूरमध्ये अनेक ठिकाणी अण्णामलाई यांची बॅनर्स झळकले आहेत. या बॅनर्सवर त्यांचा फोटो आणि त्यावर 'भयमुक्त मनाला कोणतीही मर्यादा नसते', असे लिहिले आहे. यातून ते अप्रत्यक्षपणे नवी वाट धुंडाळणार असल्याचे सूचित करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.