जत येथील पार्सल कंपनीचे ऑफिस फोडणारा जेरबंद; सांगली LCB कडून दीड लाखांच्या मुद्देमालासह बारामतीचा चोरटा गजाआड!
जत येथील डिलीव्हरी पार्सल कंपनीवर दरोडा टाकणारा आरोपी जेरबंद; १,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सांगली :- जत येथील 'डिलीव्हरी लिमिटेड' या पार्सल कंपनीचे ऑफिस फोडून रोकड लांबवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एका आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने नागज फाटा येथे सापळा रचून अटक केली आहे. वैभव बबन जाधव (वय २५, रा. ढोसेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १,५२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्याचा पिता व गुन्ह्यातील सह-आरोपी बबन सर्जेराव जाधव हा सध्या फरार आहे.
काय आहे घटना?
दिनांक २४ मे रोजी रात्री ते २५ मे च्या पहाटे दरम्यान जत येथील डिलीव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे ऑफिस फोडून चोरट्यांनी मोठी रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. (BNS) कलम ३०३ (२), ३०५ (ए), आणि ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक जत भागात पेट्रोलिंग करत होते.
पेट्रोलिंग दरम्यान नागज येथे आले असता, पोलीस अंमलदार सोमनाथ गुंडे आणि अमर नरळे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पिवळा शर्ट घातलेला एक संशयित इसम ज्याने पार्सल कंपनीत चोरी केली आहे, तो नागज फाटा येथे येणार आहे.
खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली:
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागज फाटा परिसरात पाळत ठेवून संशयित वैभव जाधव याला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या सॅकमध्ये १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड आढळून आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वैभवला पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने पाच दिवसांपूर्वी वडील बबन जाधव याच्यासोबत मिळून जतमधील पार्सल कंपनीचे ऑफिस फोडल्याची कबुली दिली.
फरार आरोपी सराईत गुन्हेगार:
या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन सर्जेराव जाधव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोल्हापूर, अहिल्यानगर (अहमदनगर), नाशिक, पुणे, सोलापूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) या जिल्ह्यांमध्ये केवळ कुरियर व पार्सल ऑफिसेस लक्ष्य करून चोऱ्या करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार अमित परिट, अनिल ऐनापुरे, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, अमर नरळे, आमसिध्द खोत, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, केरूबा चव्हाण, चालक गणेश शिंदे, विजय पाटणकर, करण परदेशी, कॅप्टन गुंडवाडे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपासासाठी आरोपीला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.