RSS चा कायापालट होणार? संघटना आणखी बळकट करण्यासाठी संघात अंतर्गत पातळीवर मोठी खांदेपालट! नक्की काय आहे नवी रणनीती? 


नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीत पुढील वर्षीपासून बदल होणार असून प्रांताऐवजी आता संभाग (विभाग) राहणार आहेत. यामुळे प्रचारकांची संख्यादेखील वाढणार आहे. हीच बाब लक्षात ठेवून यंदाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयमध्ये ८८० पैकी २३५ शिक्षार्थी हे प्रचारक आहेत. संघाच्या विचारकार्याचा विस्तार आणि संघटन उभारणीत प्रचारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या वर्गात प्रचारकांची मोठी उपस्थिती संघाच्या भावी कार्यदिशेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

संघाच्या प्रणालीत हा वर्ग प्रशिक्षणाच्या दृष्टीने सर्वांत महत्वाचा मानला जातो. ११ मे रोजी सुरू झालेल्या या वर्गात देशाच्या विविध प्रांतांमधून निवड झालेले ८८० शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. संघाच्या दैनंदिन शाखा, सामाजिक कार्य, संघटनविस्तार आणि नेतृत्व विकास यांसाठी कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात यंदा प्रचारकांची संख्या जास्त आहे. एकूण शिक्षार्थ्यांपैकी २६ टक्के प्रचारक आहेत. देशभरात शाखाविस्तार, सामाजिक समरसता, सेवा प्रकल्प, युवा संपर्क आणि संघटन उभारणीसाठी प्रचारक सातत्याने कार्यरत असतात; तर ५८३ स्वयंसेवक व्यवसाय करणारे आहेत व उर्वरित ६२ जण विद्यार्थी आहेत. यात आयआयटीतील विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. वर्गातील सहभागींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे पाहिले असता ४१३ जण पदवीधर, तर ३३२ जण पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले ३१, बारावीपर्यंत ६३ आणि इतर श्रेणीतील ४१ कार्यकर्त्याचाही समावेश आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित

या वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबागेत समारोप होणार आहे. यावेळी उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे उ‌द्बोधन होणार आहे. समारोप सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारतभूषण त्यागी, योगी भवनाथ महाराज, गजसिंह, गोपालभाई मावजी गोरसिया, दिव्यम त्रिपाठी, गोविंद मावजी गोरसिया आणि भार्गवभाई सुथार यांचा समावेश आहे, अशी माहिती सर्वाधिकारी महेंद्र सिंह मग्गो आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.