संभाजीनगरच्या राजकारणात नाराजीची ठिणगी पडली आणि तिच्या धगीची चर्चा आता राज्यभर सुरू झाली. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अन्यायाचा आरोप करत थेट हल्लाबोल केला आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. पण सत्तार यांच्या भूमिकेनं युतीतल्या अंतर्गत संघर्षाला नव्याने तोंड फुटल्याची चर्चा सुरू झाली. महायुतीत सगळं आलबेल नाही असं म्हणत सत्तारांनी उघड नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये वाद होते, ते मागे घेण्याचे वा सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आम्ही वाद मिटवत आहोत असं म्हणत सत्तार यांनी मुलाची उमेदवारी मागे घेण्याचे जाहीर केले.
अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. विधान परिषद निवडणुकीत भाजपला सोडलेल्या जागेवर मुलाचा अर्ज भरत सत्तार यांनी राजकीय बॉम्ब टाकला त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. सत्तार यांनी भाजपवर अन्यायाचा आरोप केला.प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले. रातोरात संभाजीनगरमधील पक्षाच्या प्रमुख नेत्यांना ठाण्यात बोलावण्यात आलं.रात्री उशिरापर्यंत बैठका झाल्या. प्रत्येक नेत्याशी स्वतंत्र चर्चा झाली. नाराजीची कारणं जाणून घेतली गेली. काही नेत्यांनी पालकमंत्र्यांविरोधात तक्रारी केल्याची माहिती आहे. विकास निधी मिळत नसल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली. पक्षाचं स्थानिक पातळीवर नुकसान का होतंय याचाही आढावा घेण्यात आला. यानंतर सर्वांची एकत्र बैठक झाली. शिंदेंनी स्पष्ट शब्दांत कामाला लागण्याचा सल्ला दिला. जिल्हा बँक निवडणुकीबाबतही सूचना दिल्या. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावरून सत्तार यांची कानउघाडणीही केल्याचं समजतंय. तसंच मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज मागे घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
काय झालं मध्यरात्रीच्या बैठकीत?
एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजी नगरातील 6 आमदार, 2 जिल्हाप्रमुख आणि एक खासदारासोबत बैठक झाली. रात्री 11 ते 2 अडीचपर्यंत शिंदेंनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्र पणे बैठक घेत संभाजी नगरमध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा घेतला. या बैठकीत खाजगीत अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांची तक्रार शिंदेंकडे केल्याची माहिती. विकास निधी मिळत नाही याबद्दल सत्तारांसह इतरांनी तक्रार केल्याची माहिती आहे.
महापालिका जिल्हा परिषदेसह इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं? याबाबत शिंदेंनी बैठकीत संवाद साधला, याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र सूचना दिल्या गेल्या. वैयक्तिक भेटीनंतर सर्वांची एकत्र बैठक घेऊन शिंदे यांनी सगळ्यांना सुनावलं. जिल्हा बँक निवडणुकीत जमल्यास युतीत न जमल्यास स्वतंत्र लढण्याच्या ही सूचना.. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्तार यांची कानउघाडणी. अर्ज मागे घेण्यास सत्तार यांनी तयारी दर्शवली. मात्र आपली भूमिका बदललेली नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल असं ते म्हणाले. इतकंच नाही स्वपक्षीय पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याविरोधातही सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली.सत्तार यांच्या भूमिकेनंतर इतर नेतेही पुढे येऊ लागले आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सत्तार यांची व्यथा खरी असल्याचं म्हटलंय. युतीतील पक्षांनी एकमेकांचं खच्चीकरण करणं हिताचं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली. अर्थ खात्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत लहान भावाला किंमत नाही का? असा सवाल त्यांनी केला. मात्र याच मुद्द्यावरुन भाजपने मात्र अब्दुल सत्तार यांना डिवचलंय. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती आहे.. सत्तार यांच्या मुलाला उमेदवार हवी होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांना असं वाटत असावं असं भाजपने म्हटलंय.
विधान परिषद उमेदवारीपासून सुरू झालेला वाद आता शिवसेना-भाजपमधल्या संबंधांपर्यंत पोहोचलाय. एकनाथ शिंदेंनी सध्या हे वादळ शांत केलं असलं तरी नाराजीची धग पूर्णपणे विझलेली दिसत नाही. संभाजीनगरात उमटलेला हा आवाज फक्त एका जागेचा प्रश्न नाही. तो युतीतील अस्वस्थतेचा संकेत आहे आणि आज दिसलेला हा ट्रेलर. उद्याच्या मोठ्या राजकीय संघर्षाची झलक तर नाही ना? हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.