नॅशनल हायवेवरून प्रवास करताना टोल नाक्यावर जर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागली, तर टोल टॅक्स भरावा लागत नाही, असा एक मेसेज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतो. अनेक वाहनचालक या नियमाचा हवाला देत टोल नाक्यांवर कर्मचाऱ्यांशी वाद घालतानाही दिसतात. पण खरोखरच केंद्र सरकारचा किंवा हायवे अथॉरिटीचा असा कोणताही नियम अस्तित्वात आहे का? या वाढत्या संभ्रमावर आता स्वतः भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) अधिकृत स्पष्टीकरण दिले असून यामागील नेमके सत्य काय आहे, याचा खुलासा केला आहे.
काय आहे टोलमाफीच्या दाव्याचे वास्तव?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत एनएचएआयने यासंदर्भातील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एनएचएआयने स्पष्ट केले आहे की, 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास टोल फ्री होतो, हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर टोलची वसुली ही National Highways Fee Rules, 2008 च्या नियमांनुसार केली जाते.
या अधिकृत नियमावलीमध्ये 10 सेकंदांचा असा कोणताही नियम लिहिलेला नाही. त्यामुळे टोल नाक्यावर काही कारणास्तव रांग लागली आणि तुम्हाला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायला लागले, तरीही टोल भरावाच लागणार आहे.
कुणाला मिळते सूट?
National Highways Fee Rules, 2008 मध्ये कोणत्या वाहनांना आणि व्यक्तींना टोल टॅक्समधून सूट द्यायची, याचे निकष स्पष्टपणे ठरवून दिलेले आहेत. या अधिकृत यादीव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाला टोल सवलत मिळत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी ही अधिकृत सवलत यादी प्रत्येक टोल प्लाझावर मोठ्या फलकांवर स्पष्टपणे लिहिलेली असते. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून प्रवाशांनी कोणत्याही भ्रमात राहू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.हायवे ऑथॉरिटीने वाहनचालकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक माहितीला खरे मानू नका. टोलच्या नियमांबाबत काही शंका असल्यास अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा टोल नाक्यावरील माहिती फलक तपासा. चुकीच्या माहितीच्या आधारे टोल कर्मचाऱ्यांशी वाद घातल्यास किंवा टोल न देता वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न केल्यास प्रवाशांना कायदेशीर कारवाईला किंवा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे यापुढे नॅशनल हायवेवरून प्रवास करताना 10 सेकंदांच्या या अफवेला डोक्यातून काढून टाका आणि नियमांनुसार टोल भरून सुरक्षित प्रवास करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.