गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन व केटरिंगचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या भाजप नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तिरोड्याचे नगराध्यक्ष अशोक असाटी (वय 54, रा. तिरोडा) आणि कैलास किसन वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराचा डेकोरेशन आणि केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 दरम्यान प्रशासनाला सेवा पुरवली होती. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर, 28 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी 'हर्षल केटरिंग'च्या नावाने 7 लाख 72 हजार रुपये आणि 'उज्वला डेकोरेशन'च्या नावाने 17 लाख 50 हजार रुपये, असे एकूण 25 लाख 22 हजार रुपयांचे बिल मंजुरीसाठी नगरपरिषदेकडे सादर केले होते.या बिलाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार 21 मे 2026 रोजी नगराध्यक्ष अशोक असाटी यांना भेटायला गेले. त्यावेळी असाटी यांनी हे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 3 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची अजिबात इच्छा नसल्याने त्यांनी 7 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
हातावर रक्कम लिहून केली होती मागणी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या प्रकरणाची पडताळणी केली. यावेळी तक्रारदारास 6 लाख रूपयांचा चेक दिल्याच्या मोबदल्यात 1 लाख 20 हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम पीए शुभम भोयर याच्याकडे देण्यास सांगितले. तसेच 10 लाख रूपयांचा चेक मिळाल्यावर त्याचे जे होतील ते आणून देशील, अशा प्रकारची लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यावर विभागाने 9 जून रोजी सापळा लावला व तक्रारदारास असाटीच्या कार्यालयात रक्कम घेऊन पाठवले असता, शुभम भोयर व असाटी यांना तक्रारदाराच्या वागणुकीवर संशय आल्याने त्यांनी पैसे घेण्यास टाळाटाळ केली होती. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. 21 मे रोजी झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी तोंडी लाचेची मागणी न करता तक्रारदाराच्या उजव्या हातावर '3,20,000' अशी रक्कम लिहून लाचेचा इशारा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
भाजपचा नगराध्यक्ष ताब्यात
सापळा कारवाई दरम्यान थेट रक्कम स्वीकारली नसली, तरी पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाली होती. त्यामुळे अखेर पोलिस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या फिर्यादीवरून नगराध्यक्ष अशोक असाटी याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली दर्पणच्या बातम्यासाठी www.sanglidarpan.in ला क्लिक करा follow करा
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.