कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाबाबत, केरळमधील हिंदुत्ववादी नेते आणि भाजपाच्या इंटेलेक्चुअल सेलचे माजी प्रमुख टी.जी. मोहनदास यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेले आंदोलन त्यांनी कसे हाताळले असते? यावर मोहनदास यांनी भाष्य केले आहे. मोहनदास यांनी त्यांच्या 'पत्रिका' या युट्युब चॅनेलवर याबाबत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत मोहनदास आंदोलकांवर गोळीबार करण्यासह महिलांवर अत्यंत खालच्या पातळीवर बोलताना दिसत आहेत.
काय म्हणाले टी. जी. मोहनदास?
टी. जी. मोहनदास यांनी रविवारी त्यांच्या 'पत्रिका' या युट्युब चॅनेलवर ३० मिनिटांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलन कसे हाताळले असते याबाबत बोलताना मोहनदास म्हणतात की, "मी जंतरमंतरच्या भागात सुमारे चार चौरस किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली असती. जमावाला पांगवण्यासाठी तीन वेळा सूचना केली असती आणि त्यानंतर गोळीबार केला असता. जीव वाचवण्यासाठी सगळे सैरावरा पळाले असते. यात काही जणांचा मृत्यू झाला असता, काही अपंग झाले असते. चार तासांत परिस्थिती शांत झाली असती."
मृतदेह रुग्णालयात पाठवले असते - मोहनदास
परिस्थिती शांत झाल्यानंतर, "मृतदेह गोळा करून रुग्णालयात पाठवले असते," असे मोहनदास पुढे या व्हिडिओत म्हणत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मोहनदास यांनी आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांबाबत देखील अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.
महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
"गँगरेप झाले असते. कोणतीही तक्रार आली नसती, कारण या महिलांना बलात्कार करून घ्यायला आवडतो, अशाच या महिला आहेत. विशेषतः डाव्या विचारसरणीच्या, सेक्युलर, लोकशाहीवादी महिलांना बलात्कार आवडतो. यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला हुतात्मा केले जाईल," असे वादग्रस्त वक्तव्य मोहनदास यांनी केले.
मोहनदास यांच्या विधानावरुन टीका
मोहनदास यांच्या विधानाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार ए. ए. रहिम यांनी मोहनदास यांच्यावर टीका केली. यातून भाजपाचा खरा चेहरा समोर येतो. समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने अशी विधाने केली जात आहेत. प्रक्षोभक विधानांबाबात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही स्पष्ट इशारा दिलाय. याप्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी व्हिडीओ वकिलांकडे पाठवला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार रहिम यांनी 'द हिंदू'ला दिली आहे. टी. जी. मोहनदास यांच्या या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.