🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​'खाकी' संशयाच्या भोवऱ्यात! बाबा फर्जन फार्महाऊसवरील १६ तासांच्या संशयास्पद कारवाईची उच्चस्तरीय चौकशी होणार का?

​'खाकी' संशयाच्या भोवऱ्यात! बाबा फर्जन फार्महाऊसवरील १६ तासांच्या संशयास्पद कारवाईची उच्चस्तरीय चौकशी होणार का?


‘मिटमिटा भागातील एका फार्महाऊसवर एक माणूस भली मोठी बंदूक घेऊन फिरतो’ अशी एका ओळीची टीप खबऱ्याने दिली अन् पोलीस आयुक्तांपासून ते शिपायापर्यंत सगळे पोलीस खाते बाह्या सरसावून झाडाझडतीसाठी उतरले. ‘मोठी बंदूक’ तर काही मिळाली नाही, पण पोलिसांना अपेक्षित असे घबाड मात्र मिळाले! दिवंगत कामगार नेते बाबा फर्जन यांच्या खोलीतील नोटांच्या चळती पाहून पोलिसांचे डोळे फिरले. तब्बल सोळा तास मोजून निघाले फक्त पाच कोटी! झाडाझडती सुरू होण्याअगोदर सर्च वॉरंट मागताच सटकलेल्या पोलिसांनी धमकावणीची भाषा केली! परवाने असलेला शस्त्रसाठा जप्त करून पोलिसांनी कोणती मर्दुमकी गाजवली? असे एक ना अनेक प्रश्न या कारवाईमुळे निर्माण झाले आहेत.

एकेकाळी छत्रपती संभाजीनगराच्या कामगार जगतामध्ये प्रचंड दबदबा असलेले कामगार नेते बाबा फर्जन यांचे अलिकडेच पुणे येथे निधन झाले. बाबा फर्जन हे बऱ्याच वर्षांपासून पुणे येथेच वास्तव्याला होते. मात्र शहरात त्यांची मालमत्ता आहे. मिटमिटा भागात गट क्रमांक १२६ मध्ये फर्जन यांचे मोठे फार्महाऊस असून तेथे त्यांचे नातेवाईक राहतात. या परिसरात एक माणूस ‘मोठी बंदूक’ घेऊन फिरत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांना खबऱ्याने दिली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक बनवण्यात आले.
पहाटे अडीच वाजताचा मुहूर्त ठरला शुक्रवारी पहाटे अडीच वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसवर धडकला. ‘बाबा’ असा आवाज दिल्यानंतर ढवळाबाई बजरंग घुसिंगे या महिलेने गेट उघडले.  फार्महाऊसमध्ये गेल्यानंतर शीलाबाई दोरडी (४८) हिने आपण बाबा फर्जन यांची पत्नी असल्याचे सांगितले. तिच्यासोबत नंदा मोहन वरटे (५२) ही महिला देखील होती. पोलिसांनी थेट ‘घरात शस्त्र आहे का?’ असा सवाल केला. त्यावर ‘आम्हाला काही माहिती नाही’ असे या महिलांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी झाडाझडती घ्यायची आहे, असे सांगितले. मात्र झाडाझडतीला विरोध करत या महिलांनी ‘वर्माजींना बोला’ असे सांगितले. 
दरम्यान, फार्महाऊसवरील महिलांनी एक पिस्तूल पोलिसांच्या हवाली केले. परंतु एके ४७ धुंडाळण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण फार्महाऊसचीच झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला. फार्महाऊसवर महिलाच राहतात हे माहिती असूनही पहाटे अडीच वाजता धाड का टाकण्यात आली? ही धाड दिवसाउजेडीही टाकता आली असती. पण त्यासाठी पहाटे अडीचचा मुहूर्त का निवडण्यात आला… हे गौडबंगालच आहे.

आर्थिक गुन्हे शाखेची एन्ट्री
फार्महाऊसवरील महिलांनी सुरेश सुमेर वर्मा, रा. गवळीपुरा, छावणी यांना फोन करून बोलावून घेतले. पोलीस आल्याचे कळताच सुरेश वर्मा आणि गोपाल कचरू खांडेकर तसेच सचिन रामेश्वर तायडे हे तिघे तिथे आले. वर्मा यांनी पोलिसांकडे ‘सर्च वॉरंट’ची मागणी केली. त्यावर पोलिसांनी दरडावणीची भाषा वापरली. त्यामुळे वर्मा यांनी बाबा फर्जन यांच्या खोलीची किल्ली पोलिसांकडे सोपवली. खोलीतील आलमाऱ्यांमध्ये शिस्तशीर ठेवण्यात आलेल्या नोटांच्या चळती पाहून पोलिसांचे डोळे फिरले. मग आर्थिक गुन्हे शाखेला या झाडाझडतीत सामावून घेण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे हे नोटा मोजण्याच्या दोन मशीन घेऊन फार्महाऊसवर आले. पहाटे साधारण चार वाजता नोटा मोजण्याचे काम सुरू झाले, ते शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत चालू होते. तब्बल सोळा तास नोटा मोजून पोलिसांच्या हाती लागले ५.२६ कोटी रुपये! बाबा फर्जन यांचा कामगार क्षेत्रातील दरारा, दबदबा लक्षात घेता ही रक्कम फारच किरकोळ असल्याची चर्चा आहे.
कोण हे वर्माजी?

सुरेश वर्मा आणि बाबा फर्जन हे महाविद्यालयीन काळापासून मित्र. गेल्या २० वर्षांपासून फर्जन यांची शेती पिकवण्याची जबाबदारी वर्मा यांच्याकडे होती. गेल्या वर्षी फर्जन येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर शेतीची जबाबदारी गोपाल खांडेकर यांच्याकडे त्यांनी दिली. फर्जन आजारी पडल्यानंतर त्यांनी आपल्या खोलीची एक किल्ली वर्मा यांच्याकडे दिली. फर्जन पुण्याला गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. फर्जन यांच्या पश्चात वर्मा यांनी कधीही त्यांची खोली उघडली नाही.

बँकेकडे चौकशी केली का?
बाबा फर्जन यांच्या खोलीची पोलिसांनी झाडाझडती घेतली. लोखंडी कपाट, लाकडी कपाट, पत्र्याच्या कोठ्या यात नोटांची बंडले ठासून भरण्यात आलेली होती. २००, १००, ५०, २० आणि १० रुपयांच्या नोटा होत्या. बऱ्याच नोटांच्या बंडलांना लावण्यात आलेले बँकेचे सीलही तसेच होते. काही बंडले पेपरमध्ये गुंडाळून ठेवण्यात आली होती. बंडलांना बँकांचे सील असल्यामुळे या नोटा कोणत्या बँकेतून आल्या आहेत हे स्पष्ट आहे. झाडाझडतीत पोलिसांनी बाबा फर्जन यांचे बँक पासबुक तपासले का? दुसऱ्या दिवशी संबंधित बँकेकडून या रकमेची खातरजमा करण्यात आली का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून मिळाली नाहीत. रोख रकमेसोबतच सोन्या-चांदीचे जवळपास ३० लाख रुपयांचे दागिनेही सापडले. त्याबरोबरच वेगवेगळ्या कंपनीच्या महागड्या दारूच्या ४५ बाटल्या सापडल्या. या दारूची किंमत साधारण ३४ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांचे पथक

बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसवर टाकण्यात आलेल्या छापेमारीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, योगेश वसारे, प्रदीप दंडवते, विजय निकम, सुनील पाटील, दादासाहेब झारगड, विलास कोतकर, पोलीस अंमलदार जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, राजेश यदमळ, राजाराम डाखुरे, दिनेशकुमार राठोड, प्रमोद सुरसे, अरुण भिसे, निहाल सोनटक्के, सोमनाथ दुकळे, संतोष चौरे, महिला पोलीस अंमलदार माया माळी, वैष्णवी जटाळे आदी सहभागी झाले होते.

हे प्रश्न अनुत्तरित
सर्च वॉरंट मागितल्यावर का धमकावले?
सीसीटीव्हीचा डीव्हीआर का सोबत नेला?
पहाटे ४ वाजता छापा टाकण्याचे कारण काय?
शस्त्र परवाना असतानाही झाडाझडती कशासाठी?
एके ४७ ची खबर खोटीच निघाली

बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसमध्ये एके ४७ घेऊन माणूस वावरत असल्याची टीप खबऱ्याने दिली होती. मात्र पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत कुठेही एके ४७ आढळली नाही! चार रायफल, दोन पिस्तूल, दोन एअरगनसह जवळपास साडेसहा हजार काडतुसे जप्त करण्यात आली. यात बारा बोअरचे ६३२, ७.६५ एमएम पिस्तूलचे ३ हजार ८४० असे काडतूस आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांपैकी चार शस्त्रांचा परवाना बाबा फर्जन यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. याशिवाय दुर्मिळ हत्यारेही सापडली. यात चाकू, भाला, कुऱ्हाड, गुप्ती, तलवार, कोयत्याचा समावेश आहे.
संपूर्ण फार्महाऊस सीसीटीव्हीच्या नजरेत

बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसवर जवळपास ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फार्महाऊस देखील सीसीटीव्हीच्या निगराणीत आहे. फार्महाऊसची झाडाझडती, नोटांची मोजणी, शस्त्र ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाने सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.