मुंबई-पुणे प्रवाशांची लाडकी आणि 'दख्खनची राणी' म्हणून ओळखली जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आता नव्या हेरिटेज लूकमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मध्य रेल्वेने डेक्कन क्वीनच्या ऐतिहासिक डायनिंग कारचे नूतनीकरण करून तिला पारंपरिक स्वरूप दिले आहे.
डेक्कन क्वीन ही भारतातील अशी एकमेव ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांना स्वतंत्र डायनिंग कारमध्ये बसून हॉटेलसारख्या वातावरणात भोजनाचा आनंद घेता येतो. खिडकीबाहेरचा निसर्ग आणि टेबलावरचे गरमागरम पदार्थ याची खास ओळख आहे.
महोत्सवानिमित्त ट्रेनच्या अंतर्गत सजावटीत बदल करण्यात आले आहेत. सुधारित स्वच्छतागृहे, एसी चेअर कारमधील नवीन आसनव्यवस्था, डब्यांच्या आतील भागाची नव्याने रचना आणि हेरिटेज थीमवर आधारित डायनिंग कार यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि आकर्षक झाला आहे.
१९३० पासूनचा ऐतिहासिक प्रवास
डेक्कन क्वीनची सुरुवात १९३० मध्ये केवळ सात डब्यांसह झाली होती. १९६६ मध्ये इंटिग्रल कोचेसचा समावेश करण्यात आला, तर १९९५ पासून एअर ब्रेक सुविधा असलेले रेक वापरात आले. १५ ऑगस्ट २०२१ पासून या गाडीला विस्टाडोम डबा जोडण्यात आला. त्यामुळे पश्चिम घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद प्रवाशांना अधिक जवळून घेता येऊ लागला. त्यानंतर जून २०२२ मध्ये 'प्रोजेक्ट उत्कृष्ट' अंतर्गत एलएचबी डब्यांचा समावेश करण्यात आला. सध्या ही गाडी १६ डब्यांसह धावत असून त्यामध्ये विस्टाडोम, भोजन विभाग आणि आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
डायनिंग कारमध्ये वेगळ्या आरक्षणाची गरज नाही
डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र आरक्षण करण्याची आवश्यकता नाही. ट्रेनमधील जनरल, सेकंड सीटिंग (2S), एसी चेअर कार किंवा विस्टाडोम अशा कोणत्याही वर्गातील प्रवासी डायनिंग कारमध्ये जाऊन बसू शकतात. त्यासाठी केवळ ₹५ ते ₹७० पर्यंतचा सर्व्हिस चार्ज आकारला जातो.अलीकडेच या डायनिंग कारचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्यामध्ये आरामदायी सोफा, कार्पेट, पारंपरिक वारली चित्रकला आणि हेरिटेज थीमची सजावट करण्यात आली आहे. एका वेळी ३२ प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था येथे उपलब्ध आहे.
मेन्यूमध्ये काय?
डायनिंग कारमध्ये ब्रेड-बटर, चीज टोस्ट, कटलेट, सँडविच, ऑम्लेट यांसारखे पारंपरिक आणि हलके स्नॅक्स उपलब्ध असतात. रेल्वे प्रवासातील हा 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' अनुभव आजही अनेक प्रवाशांसाठी डेक्कन क्वीनच्या आकर्षणाचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
डेक्कन क्वीनचे वेळापत्रक
१२१२४ डेक्कन क्वीन (पुणे-मुंबई CSMT) : सकाळी ७.१५ वाजता पुण्यावरून सुटते आणि १०.२५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचते. १२१२३ डेक्कन क्वीन (मुंबई CSMT-पुणे) : सायंकाळी ५.१० वाजता मुंबईहून सुटते आणि रात्री ८.२५ वाजता पुण्यात पोहोचते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.