नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर नितीन गडकरी यांना इथेनॉलच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले जात असतानाच त्यांचे पुन्हा एक वाक्य चर्चेत आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे.
त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून वादही होतो. त्यानंतर काही दिवसांपासून गडकरींना इथेनॉलच्या मुद्द्यावरून टीका सहन करावी लागत आहे. तशातच त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर स्पष्टीकरणही दिले. त्यानंतर पुन्हा एकदा गडकरींचे एक असेच वक्तव्य केले असून यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या घरात अडीज लाख रुपये वेतनावर लोक काम करतात असे ते म्हणाले. काय आहे हे प्रकरण पाहूया.
काय म्हणाले गडकरी
गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रोजगार अत्यावश्यक असून, रोजगाराचा अर्थ केवळ नोकरी नसून स्वयंरोजगारालाही तितकेच महत्त्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सुदर्शन वाल्मिकी समाजासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
सुदर्शन वाल्मिकी समाजातील तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन हाऊसकीपिंगसारख्या क्षेत्रात स्वतःच्या कंपन्या उभाराव्यात. अशा सेवांना मोठी मागणी असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. स्वतःच्या घरातील हाऊसकीपिंगचे काम एका कंपनीमार्फत करून घेत असून, त्या कंपनीला दरमहा अडीच लाख रुपये देत असल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.
दीड कोटीहून अधिक लोकांना रोजगार
देशात बाईक टॅक्सी योजना अनेक राज्यांत सुरू असून, ती महाराष्ट्रातही सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सध्या अडीच कोटी तरुण बाईक टॅक्सी सेवेद्वारे दरमहा २५ हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नसल्याने स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ५०० हून अधिक गरीब कुटुंबांसाठी घरांच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ होत असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच उत्तर नागपुरात आईच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेल्या नऊ महिन्यांत ५३ हजार गरिबांनी आरोग्यसेवा घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशात ई-रिक्षा सुरू करण्याच्या उपक्रमामुळे आज दीड कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळत असल्याचा उल्लेख करत त्यांनी तंत्रज्ञानाधारित रोजगारनिर्मितीचे महत्त्व अधोरेखित केले.
विकासाच्या संधी उपलब्ध करून देणार
सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची इमारत टीडीआर (ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स) योजनेतून उभारली जाणार असून, त्यामुळे महापालिकेवर बांधकामाचा आर्थिक भार पडणार नाही, असे गडकरी यांनी सांगितले. या योजनेची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकार झाल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रीरामांचे चरित्र समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांनी केले असून, त्यामुळे वाल्मिकी समाजाला आवश्यक सुविधा आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.