पुण्याच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर दिवसा पोलीस चौकीसमोरच गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशानुसार, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांची तात्पुरती बदली पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अजित महादेव जाधव यांनाही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.दरम्यान, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक धनंजय विठ्ठल पिंगळे यांची खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनंतर पोलिसांच्या कामगिरीवर टीका होत होती.भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेत जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रशासकीय कारवाई केली.
या आदेशानुसार एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात अशा घटनांवर अधिक कडक पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचे संकेत मिळत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.