न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागावा म्हणून काही जण न्यायाधीशांना लाच देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या घटनांबद्दल आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र कर्नाटकमध्ये यापेक्षाही धक्कादायक प्रकार घडलाय. एका 65 वर्षीय महिलेने थेट न्यायाधीशांच्या खुर्चीवरच जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केलीये. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना कर्नाटकमधील चिकबल्लापूरमध्ये घडली. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव मंजुला असून तिचं वय 65 वर्षे आहे. अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या खुर्चीवर जादूटोणा केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची माहिती न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली.
सीसीटीव्हीत नेमकं काय दिसलं?
एएनआयच्या वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंजुला न्यायालयाच्या दालनात संशयास्पद गोष्टी करताना दिसली. पोलिसांनी सांगितले की, तिने न्यायाधीशांच्या खुर्चीवर पांढऱ्या मोहरीचे दाणे टाकले होते. याच कृतीला जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी केली कारवाई
या प्रकरणी न्यायालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी नेत्रा यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली आणि त्याच्या आधारे मंजुलाला अटक करण्यात आली.मात्र चौकशीदरम्यान महिलेने नेमकं काय सांगितलं किंवा तिने या कृतीमागचं कारण काय दिलं याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलिसांनी मंजूलाविरुद्ध Karnataka Prevention and Eradication of Inhuman Evil Practices and Black Magic Act, 2017 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टोटका करण्यामागचा हेतू काय?
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, एका दिवाणी खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा किंवा खटल्याची दिशा बदलावी या उद्देशाने महिलेने हा प्रकार केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. संबंधित दिवाणी प्रकरणाशी तिचा संबंध असल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान या दाव्याला पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. महिला नेमक्या कोणत्या प्रकरणात सहभागी होती आणि कोणत्या खटल्याच्या संदर्भात तिने हा कथित टोटका करण्याचा प्रयत्न केला, याचा तपास अद्याप सुरू असून आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.