🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेवर हात उचलणे पडले महागात! अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांची उचलबांगडी; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाई!

महिलेवर हात उचलणे पडले महागात! अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांची उचलबांगडी; व्हिडिओ व्हायरल होताच कारवाई!


अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेवर धडक दिली. नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षणातील गैरप्रकारांच्या विरोधात अभिजीत दिपके यांनी शांततेच्या मार्गाने 'चलो संसद' मोर्चाची हाक दिली होती.
मात्र, परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी हिंसक कारवाई केली. त्यामुळे दिल्लीतील वातावरण भलतेच तापले होतो. पोलिसांच्या कारवाईमुळे तरुण दिल्लीतील रस्त्यांवर जिकडे तिकडे धावाधाव करत होते आणि पोलिसांची त्यांना रोखण्याची धडपड सुरु होती. विद्यार्थी आणि पोलीस यांच्यातील झटापटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी महिला आंदोलकाच्या कानशिलात लगावतानाचे दृश्य दिसत आहे. त्यावरून देशभरातून त्या पोलीस अधिकाऱ्यावर कडाडून टीका करण्यात आली. 
व्हिडीओतील पोलीस अधिकाऱ्याची आता ओळख पटली आहे. ते ईशान्य दिल्लीचे अतिरिक्त उपायुक्त  संदीप लांबा आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संदीप लांबा यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना आंदोलनस्थळावरील कर्तव्यावरून हटवून, त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठवले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी (२२ जुलै) झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

संदीप लांबा कोण आहेत?

संदीप लांबा हे DANIPS (दिल्ली, अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण, दीव आणि दादरा व नगर हवेली पोलीस सेवा) संवर्गातील २०११ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. असे ‘द प्रिंट’ने वृत्तात म्हटले की, पोलीस दलात त्यांची कुशल तपास अधिकारी म्हणून ओळख आहे. २०२१ मध्ये उत्कृष्ट तपासासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदकाने गौरवण्यात आले होते, २०२४ मध्ये DANIPS संवर्गातील दिल्ली विभागात त्यांची बदली झाली. तेव्हापासून आतापर्यंत संदीप लांबा यांची ईशान्य दिल्ली जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस उपायुक्त (Additional DCP) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून दीर्घकाळ काम केले आहे.

२० जुलैच्या विद्यार्थ्यांच्या मोर्चादरम्यान दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संदीप लांबा यांच्यावर सोपवण्यात आली होती. याचदरम्यान त्यांनी एका महिलेच्या कानशिलात मारली, असे व्हिडीओतून समोर आले. त्यामुळे त्यांना जंतरमंतर परिसरातील कर्तव्यावरून हटवण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाकडे परत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लांबा यांना जंतरमंतरवरीलत कर्तव्यावरून का हटवण्यात आले?

संसद परिसरातील आंदोलनादरम्यान त्यांनी एका महिला आंदोलकाच्या कानशिलात मारल्याचा ३६ सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून संदीप लांबा वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरील बंदोबस्ताच्या जबाबदारीतून हटवले. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुार, दिल्ली पोलिसांतील एका डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, लांबा यांनी क्षणिक रागाच्या भरात महिला आंदोलकावर हात उचलला. त्या अधिकाऱ्याने म्हटले की, महिला आंदोलकाच्या हातात खिळ्यासारखी धारदार वस्तू होती. 
आंदोलनस्थळ सोडा, असे वारंवार निर्देश देऊनही तिने ते मान्य केले नाही. त्यानंतर ती लांबा यांच्याशी वाद घालू लागली. “या वादात अधिकाऱ्याने संयम गमावला आणि हात उचलला. महिला आंदोलकांशी वागताना शिस्त आणि संयम राखण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत,” असेही त्या अधिकाऱ्याने नमूद केले. पोलिसांकडून आंदोलकांवर अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी (२२ जुलै) सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी सरन्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर त्या व्हिडीओचा उल्लेख केला. “ती महिला कोणतीही हालचाल करीत नाही. मी न्यायालयाला आताच व्हिडीओ दाखवू शकतो. गणवेशातील अधिकारी जबाबदार असतील, तर त्यांची नावं घेण्यास आपण घाबरता कामा नये. संबंधित अधिकाऱ्याला न्यायालयात बोलावून त्याची जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे,” असा युक्तिवाद वकिलांनी केला.
दरम्यान, या प्रकरणानंतर संदीप लांबा यांची अडचण वाढली. पोलिसांच्या हिंसक कारवाईचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच संदीप लांबा यांच्या कृतीमुळे ते टीकेचे धनी ठरले. तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार साकेत गोखले यांनी लांबांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गोखले यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत म्हटले, 'पोलिसांच्या कारवाई संदर्भातील याचिकांवर सरकारचे उत्तर असे होते की, कोणीही एफआयआरसाठी पोलिसांकडे गेले नव्हते. त्यामुळे आज मी पोलिसांत तक्रार दाखल केली.'

२० जुलैला नेमके काय घडले?

२० जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) दिल्लीत ‘चलो संसद’ मोर्चाचे आयोजन केले. हजारो विद्यार्थी आणि तरुण जंतरमंतर येथे दाखल झाले. पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. सरकारने चर्चेसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे तरुणांनी संसदेच्या दिशेने चालणे सुरू करताच पोलिसांनी आंदोलकांना अडवले. या मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. त्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सने लाठीहल्ला केला. या झटापटीत शेकडो आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले; तर अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन थांबले नाही. रात्री उशिरापर्यंत आंदोलक पुन्हा जंतरमंतर येथे जमले. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनाला संबोधित करीत विद्यार्थ्यांचे संरक्षण करता आले नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरही जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच आहे. दिल्ली पोलिसांसोबत बीएसएफ आणि इतर निमलष्करी दलांना परिसरात तैनात करण्यात आले आहे.
२१ जुलै रोजी विरोधकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.