पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस अंमलदार आणि कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या अंतर्गत बदल्यांनंतर पोलीस दलात नव्या चर्चेला उधाण आले आहे. बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट आदेश पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी दिले आहेत. याबाबत गेल्या सोमवार आणि मंगळवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या आदेशानंतरही काही कर्मचारी अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
आयुक्तालयाकडून कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच शाखेत किंवा पोलीस ठाण्यात कायम असल्याची चर्चा आहे. विशेषतः वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आणि काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली आदेश निघूनही काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. याउलट, बदली आदेश मिळाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी तातडीने नवीन ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारला आहे.
त्यामुळे सर्वांसाठी एकच नियम आहे की काही जणांना वेगळे निकष लागू केले जात आहेत, असा प्रश्न दलातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि समान निकषांवर राबविली गेली पाहिजे. आदेश निघाल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला समान पद्धतीने कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी पाठविणे आवश्यक आहे. अन्यथा दलात दुजाभावाची भावना निर्माण होऊ शकते.
दरम्यान, या चर्चांबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने नवीन पोलीस ठाण्यात किंवा शाखेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व बदली आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होते का, तसेच सर्व कर्मचाऱ्यांवर समान निकष लागू केले जातात का, याकडे पोलीस दलासह शहराचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.