राज्यातील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी धुळ्यातून संशयित प्रशांत तुळशीराम वाडिले यास अटक करण्यात आली असून आता तपासातून त्याचे धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. त्याने एका शिक्षण संस्थेतील सहा जणांना बनावट 'शालार्थ आयडी' मिळवून देण्यासाठी दीड कोटी रुपये उकळले आहेत. त्यानुसार वाडिले हा शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून वीस ते पंचवीस लाख रुपये घेत होता अशी माहिती तपासात समोर येत आहे.
वाडिले याने शालार्थ घोटाळ्यातून कोट्यवधी रुपयांची 'माया' जमवल्याची माहिती समोर आली आहे. त्याची संपत्ती पाहून तपास यंत्रणेचेही डोळे पांढरे झाले आहेत. त्याने धुळ्यात ४ गुन्ह्यांमध्ये तब्बल तीन कोटींचा आलिशान बंगला बांधला असून, कार, दुचाकी, विविध भागांत फ्लॅट्स, धुळ्यात अनेक ठिकाणी जमिनी अशा कोट्यवधींची मालमत्ता जमा केली आहे.
वाडिले याच्या धुळ्यात ८ शिक्षण संस्था असून त्यापैकी ६ बंद आहेत तर फक्त २ सुरू आहेत. मात्र, कागदोपत्री त्याने तब्बल ६५ शाळा दाखवल्या आहेत. बनावट संस्थांचे जाळे त्याने उभारले. वाडिले याने एका शिक्षण संस्थेतील ६ शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी ६० लाख घेतले.
वाडिले याने बनावट 'शालार्थ आयडी' तयार करून देण्यासाठी प्रतिव्यक्ति २० ते २५ लाख उकळले. वाडिले हा १० ते १२ लाख स्वतःकडे ठेवत उर्वरित रक्कम शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देत होता. शिक्षकांचे वैद्यकीय बिले मंजुरी, वेतनाचा फरक काढून देण्यासाठी तो ५० टक्के कमिशन घ्यायचा. वाडिलेचा धुळ्यात चार गुंठ्यांत तीन कोटींचा अलिशान बंगला आहे. संशयित प्रशांत वाडिले याच्या घरझडतीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे नाशिक पोलिसांच्या हाती लागले आहेत.
वाडिले यास रविवारी (दि. १२) न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित वाडिले याने मंत्रालयात मान्यतेसाठी ज्या-ज्या संस्थांच्या फाइल्स दिल्या आहेत, त्या प्रत्येक संस्थेची नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाण्याचे संकेत आहेत. संशयित वाडिले याने मंत्रालयात बनावट प्रस्ताव व मान्यतेसाठी दिलेल्या सुमारे ५३ फाईल्स आहेत. यात जळगाव व धुळे जिल्ह्यांतील बहुतांश शिक्षण संस्था आहेत. यामुळे आता या संस्थांच्या अडचणी वाढतील.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक विभागाच्या शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणी मार्चमध्ये नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीसह तिघांना यापूर्वीच अटक झाली. बनावट मान्यतेचे प्रस्ताव तयार करून शिक्षण संस्थाचालक, शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीचे लाभ मिळवून देणारा संशयित शिक्षण संस्थाचालक व एजंटगिरी करणारा प्रशांत तुळशीराम वाडिले यास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. ११) पहाटे धुळ्यात अटक केली.या प्रकरणात शासनाची १६० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. नाशिक विभागातील सुमारे ८४१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बोगस असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक नेमले आहे. सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके तपास करीत आहेत. संशयित वाडिले याने किती शिक्षकांची भरती केली, कोणकोणत्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची भरती केली यासंदर्भात सखोल चौकशी केली जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.