Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार..." मनसे नेत्याची फडणविसांवर उपरोधिक आणि आक्रमक टीका!

​"दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार..." मनसे नेत्याची फडणविसांवर उपरोधिक आणि आक्रमक टीका!


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली. ज्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यापूर्वी येथील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. यावरुन मिसिंग लिंकच्या कामाच्या दर्जाबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. 
या वादात आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत महायुती सरकारला खोचक टोला लगावला आहे. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूंच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे,” असे संदीप देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, महायुती सरकारमधील भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा देशाच्या अधोगतीचे आणि मागे पडण्याचे खापर काँग्रेसचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरला नेहरु यांच्यावर फोडले जाते. हाच मुद्दा लक्षात घेत संदीप देशपांडे यांनी मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरड कोसळल्यामुळे सोमवारी दिवसभर मिसिंग लिंकवरील मुंबई आणि पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली होती. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करुन मिसिंग लिंकवरील ढिगारा हटवल्याचा व्हिडीओ ट्विट करत या मार्गावरील वाहतूक सुरु झाल्याचे सांगितले होते.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? 
या घटनेबाबत विरोधकांच्या आरोपाला उत्तर देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळली. या सगळ्या घटना निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाने सगळी तयारी केली होती, पण त्याच्या विपरीत घटना घडत आहेत.

मुंबई पुणे महामार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळल्या त्या ठिकाणी सरासरी पेक्षा तीनपट जास्त आणि मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे खाली आले. त्यामुळे अनेक छोटी वाहने अडकून पडली. १०० टनांपेक्षा मातीचे ढिगारा तिथे आला जे आजपर्यंत कधीही झाले नव्हते. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारची दरड न कोसळलेल्या भागात ही घटना घडली आहे.”


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.