🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिक : ४ लाखांच्या लाचेची मागणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

नाशिक : ४ लाखांच्या लाचेची मागणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा


नाशिक : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भावाला आरोपी न करणे आणि अटक न करण्याच्या मोबदल्यात चार लाख रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन खासगी व्यक्तींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षकाशी भेट घालून देण्यासाठी एका संशयिताने लाचेच्या रकमेपैकी ५० हजार रुपये तक्रारदाराकडून ऑनलाइन स्वीकारले.

या गुन्ह्यातील संशयितांमध्ये येवला तालुका पोलीस ठाण्यातील तत्कालीन आणि सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत हर्षवर्धन दिलीप बहीर, तसेच खासगी व्यक्ती सुनिल शिवाजी बोराडे (वय ३४, रा. पाटोदा, ता. येवला) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३७, रा. पाटोदा, ता. येवला) यांचा समावेश असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करणे आणि अटक न करण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्या सांगण्यावरून व त्यांच्यावतीने खासगी व्यक्ती सुनिल बोराडे याने चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच, पोलीस उपनिरीक्षक बहीर यांच्याशी भेट घालून देण्यासाठी सुनिल बोराडे याने लाचेच्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर उपनिरीक्षक बहीर यांच्या सांगण्यावरून व त्यांच्यावतीने तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. तसेच, लाचेची रक्कम पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांना देण्यासाठी खासगी व्यक्ती जगदीश बोराडे याने तक्रारदाराला प्रोत्साहन दिले. यावरून तिन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पडताळणी अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस निरीक्षक पूनम केदार यांनी जबाबदारी सांभाळली. कारवाई पथकात पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण तसेच पोलीस शिपाई समीर शेख यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक करीत आहेत.
दरम्यान, शासकीय कार्यालयातील कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणतीही खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात काही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शरणपूर रस्त्यावरील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांना ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल. तसेच ०२५३-२५७५६२८, ०२५३-२५७८२३० किंवा ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही संपर्क साधता येईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.