सांगली महापालिकेच्या वादग्रस्त सुधारित करआकारणीवरून सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत गृहयुद्ध अखेर चव्हाट्यावर आले आहे. पक्षाच्या दोन प्रमुख आमदारांनी या मुद्द्यावर परस्परविरोधी आणि आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपमधील उभी फूट आता उघड झाली आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी या जुलमी करवाढीचे जाहीर समर्थन केले असताना, भाजपचेच दुसरे आमदार सुरेश खाडे यांनी गाडगीळ यांच्या भूमिकेला जाहीर छेद देत प्रशासनाला घरचा आहेर दिला आहे.
महापालिकेने लागू केलेल्या नवीन कररचनेविरोधात सांगलीकरांमध्ये तीव्र संताप आहे. 'करवाढ कृती समिती' रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मात्र "शहरातील ९० टक्के नागरिकांना ही करवाढ मान्य आहे" असा अजब दावा करत जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भांडवली मूल्यावर आधारित या करआकारणीची पाठराखण केली आहे.
दुसरीकडे, महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी ज्यांनी हरकती घेतल्या नाहीत, त्यांना थेट बिले थडकवण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला आणि आमदार गाडगीळ यांच्या दाव्याला आमदार सुरेश खाडे यांनी थेट आव्हान दिले आहे.
'ज्यांनी हरकती घेतल्या नाहीत, त्यांना करवाढ मान्य समजणे चुकीचे!' – आ. खाडे यांचा पलटवार
गुरूवारी घेतलेल्या धडक पत्रकार बैठकीत आमदार सुरेश खाडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आमदार गाडगीळ यांचे नाव न घेता टोला लगावताना ते म्हणाले, "आमदार गाडगीळ यांनी काय भूमिका घेतली, हे मला माहीत नाही आणि मला त्यांच्याशी चर्चा करण्याची गरजही वाटली नाही. पण, जनतेवर लादली गेलेली दुप्पट-तिप्पट करवाढ ही पूर्णपणे अयोग्य आणि अन्यायकारक आहे. ज्या नागरिकांनी वेळेअभावी किंवा अन्य कारणांमुळे हरकती नोंदवल्या नाहीत, त्यांना ही करवाढ मान्य आहे असे समजणे मूर्खपणाचे ठरेल." आमदार खाडे यांनी पुढे स्पष्ट केले की, या संपूर्ण करवाढीचा आढावा घेण्यासाठी समिती नेमली जाईल आणि अंतिम निर्णय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारातच होईल.आमदारांमधील या उघड संघर्षावरून, सांगलीतील वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावर भाजपमध्ये 'एकमत' नसून 'भीषण मतभेद' असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जनतेच्या रोषाला सामोरे जाताना भाजप नेत्यांमध्येच सुरू असलेल्या या जुगलबंदीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळच उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.